थुकरटवाडीतील प्रत्येक विनोदवीर रसिकांचे धम्माल मनोरंजन करत असतो. कॉमेडीचे भन्नाट टायमिंग आणि धम्माल मस्ती यामुळे चला हवा येऊ द्या हा शो तुफान लोकप्रिय ठरला आहे. कुशल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, भाऊ कदम आणि श्रेया बुगडे रसिकांचे मनोरंजन करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. रसिकांना ते पोटधरून हसवतात. या कॉमेडी शोमधून रसिकांना खळखळून हसवणारा तसंच त्यांची सगळी दुःख विसरायला लावणारा आणि तुफान मनोरंजन करणारा कॉमेडी अभिनेता अंकुर वाढवेचाही यात समावेश आहे.
अंकुरने त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. अंकुर पूर्वी भांड्यांवर नावं लिहियचा, त्यासाठी त्याला प्रत्येक भांड्यामागे दोन रुपये मिळायचे. त्याने त्याच्या बहिणीच्या लग्नाच्या निमित्ताने कित्येक वर्षांनी भांड्यावर नावं लिहिली याचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि त्यासोबत लिहिले आहे की, बहिणीचं लग्न आहे त्यानिमिताने परत मशीन आईने हातात दिली आणि जुने दिवस बेलोऱ्याचे आठवले... बेलोऱ्यात लगीन सराईत भांड्यावर नाव टाकायचे दोन रुपये घ्यायचो... अक्षर चांगलं म्हणून लोकं यायचे. दिवसाला 100 रुपये कमवायचो... आज बायकोने एक कप चहा दिला...
अंकुर अभिनेत्यासोबत उत्तम कवीदेखील आहे. त्याच्या पुन्हा प्रेमगीत गाण्यासाठी या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले होते. त्याने करून गेलो गाव, गाढवाचं लग्न, सर्किट हाऊस, आम्ही सारे फर्स्ट क्लास, सायलेन्स आणि कन्हैया या नाटकात काम केले आहे.