काल सगळीकडेच रक्षाबंधनाचा दिवस थाटात साजरा झाला. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते. मात्र मुंबईच्या सायन रुग्णालयात एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. प्रिया वाखरीकर या रुग्णालयात गेली ३० वर्षे परिचारिका म्हणून काम करतात. मात्र रेल्वे अपघातात त्यांनी एक पाय आणि एक हात गमावला. सायन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. रक्षाबंधनाच्या दिवशी अंकुश चौधरीने (Ankush Chaudhary) स्वत: त्यांना राखी बांधत त्यांचं रक्षण करण्याचं वचन दिलं आहे. बहीण भावाच्या नात्याचं हे अनोखं रक्षाबंधन काल पाहायला मिळालं.
अभिनेता अंकुश चौधरी काल रक्षाबंधनाच्या दिवशी सायन रुग्णालयात पोहोचला. परिचारिका प्रिया वाखरीकर यांना भेटून त्याने राखी बांधली. त्यांना छानसं गिफ्टही दिलं. यावेळी त्याने दिलेली प्रतिक्रिया मन जिंकणारी आहे. अंकुश म्हणाला, 'मुळे काकांची ही कल्पना होती. त्यांनी मला काल फोन करुन सांगितलं. त्यांनी प्रिया ताईंचा किस्सा सांगितला. असंख्य बहिणी आयुष्यात आहेत. आज अजून एक बहीण मिळाली. हे नातं आयुष्यभरासाठी राहील. फक्त आजचा दिवस साजरा करायचा म्हणून आपण भेटलो असं विचार करायला नको. हा आयुष्यभरासाठी आपल्या दोघांसाठी राहणार आहे. एक बहीण म्हणून भाऊ म्हणून आपलं नातं असंच राहील.'
अंकुश पुढे म्हणाला,'आज सायन रुग्णालयात येऊन इथल्या परिचारिकांना बघून आईची आठवण आली. ती सुद्धा बॉम्बे पोर्ट ट्रस्टमध्ये नर्स होती. लहानपणीपासून मी तिची धावपळ बघितली आहे. आज ती नाहीए पण आजही इंजेक्शन बघितलं की ती आठवते. आज इथे आल्याने या सगळ्यांमध्ये मला आईच भेटली. सगळ्यांचे आभार. प्रिया ताईंचा हसरा चेहरा उत्साह देणारा आहे.'
अंकुशच्या या कृतीचं सगळेच कौतुक करत आहेत. त्याने प्रिया ताईंच्या चेहऱ्यावर हसू आणलंय. तर प्रिया वाखरीकर यांनीही मी पुन्हा उभी राहीन आणि रुग्णांची सेवा करेन असं आश्वासन दिलं. तेव्हा उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले.