मराठी सिनेमातील चित्रपट व कलेतील उत्कृष्टता साजरी करण्यासाठी फिल्मफेअर अवॉर्ड्स मराठी पुन्हा एकदा येत आहे. गौरवशाली पुरस्कारांच्या ह्या सातव्या पर्वाच्या आयोजनासाठी प्लॅनेट मराठीशी टायटल पार्टनर म्हणून सहयोग करण्यात आला आहे. फिल्मफेअर अवॉर्ड्स मराठी २०२२ ह्या बहुप्रतिक्षित पुरस्कारांद्वारे, १ जानेवारी २०२२ आणि ३१ डिसेंबर २०२२ या कालखंडात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांतील, सर्वांत स्मरणीय कामांपैकी काहींचा, गौरव केला जाणार आहे. यंदाच्या भव्य उत्सवात मनोरंजक नाट्ये, जादूई क्षण आणि नेत्रसुखद विजय बघायला मिळणार आहेत. मुंबईतील मुलुंड येथील महाकवी कालीदास नाट्यमंदिरात, ३० मार्च २०२३ रोजी रंगणार असलेली ही मानाची पुरस्कार रजनी, पात्र विजेत्यांना, प्रतिष्ठेचे प्रतीक असलेल्या ब्लॅक लेडीने सन्मानित करणार आहे.
या बहुप्रतिक्षित सोहळ्याची सुरुवात म्हणून २३ मार्च २०२३ रोजी मुंबईत एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. प्रतिभावंत कलावंत आणि देखणी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने फिल्मफेअरचे संपादक जितेश पिल्लई आणि प्लॅनेट मराठी ओटीटीचे प्रमुख व संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांच्यासोबत नवीन पर्वाच्या शुभारंभासाठी दीप प्रज्ज्वलित केला. त्यानंतर माध्यमाच्या प्रतिनिधींना संबोधित करण्यात आले आणि आगामी पुरस्कार सोहळ्याची एक झलक त्यांना दाखवण्यात आली.