अभिनेते अन्नू कपूर हरहुन्नरी कलाकार आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘खानदानी शफाखान’ या चित्रपटात अन्नू कपूर वकीलाच्या भूमिकेत दिसले. अन्नू कपूर यांच्यासह सोनाक्षी सिन्हा, बादशाह, वरूण शर्मा अशा अनेक दिग्गज कलाकारांनी यात उत्तम अभिनय केला. पण कदाचित चित्रपटाचा इतका बोल्ड विषय प्रेक्षक पचवू शकले नाहीत आणि बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा फार कमाल दाखवू शकला नाही. यानंतर लगेच अन्नू कपूर यांची प्रतिक्रिया आली. मी अॅक्टिंग करून थकलोय. आता दिग्दर्शन करणार, असे ते म्हणाले.
न्यूज 18 हिंदीला दिलेल्या मुलाखतीत अन्नू कपूर यांनी तेच ते रोल ऑफर होत असल्याबद्दल नाराजी बोलून दाखवली. अलीकडे मला वकिलाचेच 10 रोल असे ऑफर होतात की, त्यापैकी कमीत कमी 8 रोल मी स्वत:च नाकारतो. मी आधी ज्या भूमिका वठवल्या. त्याच भूमिकांसाठी मला वारंवार विचारणा होते. हे पाहून लोक मला रोल ऑफर करत नाहीत तर माझा अपमान करत आहेत, असे मला वाटते.
भूमिका द्यायच्या तर चांगल्या द्या, अन्यथा देऊ नका. आता मला अॅक्टिंग करून उबग आलाय. वकीलाची भूमिका करून करून मी थकलोय. यापेक्षा मी चित्रपट बनवावा, असे मला वाटतेय, असे अन्नू कपूर म्हणाले.
सध्या माझ्याकडे चार कथा आहेत. यावर सध्या काम सुरु आहे. 2020 मध्ये मी दिग्दर्शित केलेला सिनेमा प्रेक्षकांना पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले. 1994 मध्ये चिल्ड्रन फिल्म सोसायटी, इंडियासाठी अन्नू कपूर यांनी ‘अभय- द फिअरलेस’ नामक सिनेमा बनवला होता. अन्नू कपूर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला त्या वर्षाचा सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता.