मराठी अभिनेत्री प्रिया बेर्डे या मूळच्या कोल्हापूरच्या असून त्यांना खाणे आणि इतरांना खाऊ घालणे खूप आवडायचे. तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा बनवण्यात त्या अगदी पटाईत आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सोबत लग्न झाल्यावर त्या सासरी गेल्यावर कोकणी पद्धतीचे जेवण बनवायला शिकल्या होत्या. शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने बनवून ते स्वादिष्ट कसे होतील यात त्यांचा हातखंडा आहे. त्यामुळे त्यांनी पुढे जाऊन हॉटेल व्यवसायात उतरण्याचे ठरवले.
लोणावळा परिसरातील बावधन परिसरात प्रिया बेर्डे यांनी चख ले या नावाने हॉटेल व्यवसाय सुरू केला. या हॉटेलमध्ये सुरुवातीला शाकाहारी खाद्य पदार्थ मिळू लागले त्यानंतर खवय्यांच्या आग्रहाखातर मांसाहारी खाद्य पदार्थ देखील तिथे बनवले जाऊ लागले. हे हॉटेल स्वतः प्रिया बेर्डे चालवत नसल्या तरी अनेकदा त्या हॉटेलमध्ये जाऊन तिथले कामकाज पाहण्यासाठी येतात.
नुकतेच प्रिया बेर्डे यांनी या हॉटेलबाबत जाहीर केले आहे. बावधन जवळच असलेल्या पौंड रोडवर हे दुसरे हॉटेल सुरू केले आहे. या हॉटेललाही ‘चख ले’ हेच नाव दिले आहे. चख ले या नावाने दुसरे हॉटेल सुरू करताच प्रिया बेर्डेचे सेलिब्रिटींकडून मोठे कौतुक होताना दिसत आहे. नव्याने स्थापन केलेल्या त्यांच्या या हॉटेलमध्ये खवय्यांना पंजाबी, चायनीज, पावभाजी, ज्यूस असे पदार्थ चाखता येणार आहेत.