अंशुमन विचारेने आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केले आहे. अंशुमन विचारे अॅक्टींग अकॅडमी’च्या वतीने सामाजिक, कृषी, वैद्यकीय, कला आणि शैक्षणिक क्षेत्रात असामान्य कर्तृत्व करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार सोहळा १४ मार्च रोजी काशिनाथ घाणेकर नाट्यगृहमध्ये (मिनी थिएटर) आयोजित करण्यात आला होता. या पुरस्कार सोहळ्यात चित्रपट क्षेत्रातील कलावंत महेश कोठारे, उषा नाडकर्णी, विजय गोखले, अरुण नलावडे आणि तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सामान्यापासून असामान्य बनलेल्या ‘अंजली केवळ’ यांनी स्वत:च्या मुलीला ‘थॅलेसेमिया’ या रक्ताशी संबंधीत अनुवांशिक आजारापासून वाचवण्यासाठी त्यांनी अनुभवलेला खडतर प्रवास, सोबतीला आलेले अनेक वाईट अनुभव यांना हिंमतीने सामोरे जाऊन थॅलेसेमिया पीडितांना मदत करण्यासाठी ‘ऋतुजा फाऊंडेशन’ची स्थापना केली. ‘
ठाण्यातील सामाजिक कार्यकर्त्या ‘वर्षा परचुरे’ या मोखाडा, जव्हार या आदिवासी पाड्यातील लहान मुलांसाठी काम करतात. त्या मुलांच्या शैक्षणिक गरजा भागवणे, आरोग्याविषयी तक्रारींवर सरकारचे लक्ष वेधून घेणे, त्यांच्या दैनंदिन गरजा भागवणे, अडीअडचणींवर मात करणे, पाड्यावर कोणाला कोणाकडून त्रास होत असेल तर स्वत: लक्ष देऊन ते प्रकरण मिटवणे आदी गोष्टींकडे त्यांचे विशेष आहे.
अशा या सामान्य व्यक्तींचे असामान्य कर्तृत्व जाणून घेतल्यावर आपला संपूर्ण देश त्यांना नक्की सलाम करेल आणि इतरांनाही देश सेवा आणि सामाजिक सेवा करण्यासाठी प्रेरित करेल. या पुरस्कार सोहळ्याची रंगत वाढवली ती मराठी सिनेनाट्यसृष्टीतील कलाकारांनी. विशाखा सुभेदार, समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, पंढरीनाथ कांबळे यांच्या धमाकेदार विनोदी परफॉर्मन्सने तर उपस्थित प्रेक्षकांना आणि पाहुण्यांना पोटधरुन हसायला भाग पाडले. तसेच कलाकारांच्या डान्स परफॉर्मन्सने देखील कार्यक्रमाची शोभा वाढवली. अत्यंत आनंदी वातावरणात हा आगळावेगळा ‘अ.क.स.’ पुरस्कार सोहळा पार पडला.