काहीच दिवसांमध्ये घराघरात रक्षाबंधन सण साजरा होणार आहे. भाऊ-बहिणींच्या नात्याचा हा पवित्र सण सगळ्यांचा आवडता सण. मराठी मालिकांमध्येही हा सण उत्साहात साजरा होताना दिसणार आहे. 'कलर्स मराठी'वरील 'अंतरपाट' मालिकेतही आगळेवेगळे 'रक्षाबंधन' साजरे झालेले पाहायला मिळणार आहे. मालिकेच्या 'रक्षाबंधन' विशेष भागात जान्हवी गौतमीला राखी बांधणार आहे.
बहिणीच बांधणार एकमेकांना राखी
'अंतरपाट' या मालिकेत नुकतचं गौतमीने आपल्या जीवावर उधार होऊन जान्हवीला मुंबईहून सुखरुप कोकणात आणलं आहे. तसेच तिला आश्रयदेखील दिला आहे. गौतमीने जान्हवीचं एका भावाप्रमाणे रक्षण करत तिचा जीवदेखील वाचवला आहे. जो आपलं रक्षण करतो त्याला आपण रक्षाबंधनाला राखी बांधत असतो. याप्रमाणेच जान्हवीसाठी आपली रक्षणकर्ती गौतमी असल्याने ती तिलाच राखी बांधताना दिसणार आहे.
हा विशेष भाग कधी बघायला मिळणार?
'अंतरपाट' मालिकेत सध्या क्षितिज आणि गौतमीची मैत्री फुलताना दिसत आहे. घरच्यांनी त्यांच्या संसाराचा घाट घातल्याने त्यांनी सुखी संसाराचं नाटक काही दिवस सुरूच ठेवण्याचं ठरवलं आहे. अशातच मालिकेत अनेक रंजक वळणे येणार आहेत. क्षितिज गौतमीमध्ये गुंतत चालल्याचं जान्हवीला जाणवतं. त्यामुळे गौतमीला सर्व काही खरं सांगून तिच्या आयुष्यातून कायमचं निघून जाण्याचा निर्णय जान्हवीने घेतला आहे. हा रक्षाबंधन विशेष भाग प्रेक्षकांना येत्या १७ ऑगस्टला पाहायला मिळणार आहे. 'अंतरपाट’ मालिकेत सोमवार ते शनिवार 7:30 वा प्रेक्षकांना बघायला मिळेल.
रश्मी अनपट काय म्हणाली?
रक्षाबंधन विशेष भागाबद्दल बोलताना गौतमी उर्फ रश्मी अनपट म्हणाली,"आजपर्यंत रक्षाबंधन म्हटलं की बहिणीने भावाला राखी बांधणं, ओवाळणं हेच मी करत आली आहे. पण जेव्हा जान्हवी मला म्हणाली की आज मला तुम्हाला राखी बांधायची आहे. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. मला वाटतं, रक्षाबंधन हे फक्त भाऊ आणि बहिण या नात्यापुरतं मर्यादित न राहता दोन बहिणीदेखील रक्षाबंधन साजरं करू शकतात. राखी बांधण्यामागे आपल्या भावाने आयुष्यभर आपली काळजी घ्यावी हीच भावना असते. आता जान्हवीने मला राखी बांधण्यामागेदेखील हाच विचार आहे. त्यामुळे आता जान्हवीच्या प्रत्येक सुख-दु:खात मी सहभागी आहे".