Join us

Me Too : अनु मलिक यांच्याविरोधात पुरावेच नाहीत; महिला आयोगाने घेतला मोठा निर्णय!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 1:31 PM

लैंगिक गैरवर्तनाचे आरोप झेलणारे बॉलिवूडचे म्युझिक डायरेक्टर व कम्पोजर अनु मलिक यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देअनु मलिक गत दोन वर्षांपासून लैंगिक गैरवर्तनाचे आरोप झेलत आहेत.

लैंगिक गैरवर्तनाचे आरोप झेलणारे बॉलिवूडचे म्युझिक डायरेक्टर व कम्पोजर अनु मलिक यांना  मोठा दिलासा मिळाला आहे. होय, कुठलेही सबळ पुरावे न मिळाल्याने महिला आयोगाने अनु मलिक यांच्या विरोधातील केसची फाईल तूर्तास बंद केली आहे.मुंबई मिररने याबाबतचे वृत्त दिले आहे.  अनु मलिकविरोधात महिला आयोगाला कुठलेही ठोस पुरावे सापडले नाहीत. त्यामुळे आयोगाला हा निर्णय घ्यावा लागला. अर्थात आरोप करणा-या महिलांनी ठोस पुरावे सादर केल्यास ही केस पुन्हा उघडली जाऊ शकते.

 राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी सांगितले की, तक्रारकर्त्यांना याबाबत माहिती कळवली होती. यावर तक्रारकर्तीने  ती सध्या प्रवास करत असून परत आल्यावर भेटणार असल्याचे कळवले होते. आयोगने 45 दिवसांपर्यंत त्यांची वाट पाहिली आणि कागदपत्रांचीही मागणी केली, मात्र, त्यांच्याकडून कुठलेही उत्तर आले  नाही. अनु मलिक यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप केलेल्या इतर महिलांकडूनही काहीही उत्तर आले नाही.तक्रारकर्ती पुरावे घेऊन आली तर या प्रकरणावर पुन्हा काम केले जाईल, असेही रेखा शर्मा यांनी सांगितले.

अनु मलिक गत दोन वर्षांपासून लैंगिक गैरवर्तनाचे आरोप झेलत आहेत. 2018 मध्ये मीटू मोहिमेअंतर्गत त्यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले गेले होते. सिंगर सोना मोहपात्रा हिने सर्वप्रथम अनु मलिक यांच्यावर आरोप केला होता.  गायिका नेहा भसीन आणि श्वेता पंडित यांनी सोनाला पाठिंबा देत अनु मलिक यांच्यावर अनेक आरोप ठेवले होते. त्यावेळी अनु मलिक ‘इंडियन आयडल 10’चे जज होते. या आरोपानंतर त्यांना या शोमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. अर्थात प्रकरण काहीसे शांत झाल्यानंतर अनु मलिक पुन्हा ‘इंडियन आयडल 11’मध्ये  जज म्हणून परतले. यानंतर सोना मोहपात्राने पुन्हा एकदा त्यांच्याविरोधात मोर्चा उघडला होता. तिने दबाव इतका वाढला की, अनु मलिकला यावेळी शोमधून बाहेर पडावे लागले.

टॅग्स :अनु मलिकमीटू