'एक थी बेगम' ही अश्रफ उर्फ सपनाची कहाणी जिने तिच्या पतीच्या हत्येचा बदला घेण्याची शपथ घेतली होती. याच सत्य घटनेवरून प्रेरित एक थी बेगम ही वेबसिरिज मालिका ८ एप्रिलपासून एमएक्स प्लेयरवर विनामूल्य प्रदर्शित होणार आहे.रिव्हेंज स्टोरी असलेल्या 'एक थी बेगम'चा नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून सचिन दरेकर दिग्दर्शित १४ भागाची ही सिरीज त्यांनीच लिहिली आहे. या वेबसिरीज विषयी सचिन दरेकर सांगतात, “ही कथा एका असामान्य स्त्री ची आहे जी स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि स्वतःच्या माणसांसाठी किती आणि काय करू शकते हे सांगते, कथेतील सर्वच पात्र फार महत्वाची कामगिरी या कथेत बजावत आहेत, आणि सगळ्याच कलाकरांनी ती पात्र जिवंत उभी केली आहेत.”
अनुजा साठे या वेबसिरीज मध्ये अश्रफ भाटकर ऊर्फ सपनाची मुख्य भूमिका साकारत आहे. अशा असामान्य भूमिकेबद्दल अनुजा सांगते “आपण सहसा पुरुषांनी माफिया / डॉनवर साकारलेले चित्रपट आणि गोष्टी पाहिल्या आहेत. ही गोष्ट एका स्त्रीची आहे जी स्वतःच्या दुःखावर मात करून माफिया क्वीन बनते. यापूर्वी विविध प्रकारच्या भूमिका मी साकारल्या आहेत, पण अशी आवाहानात्मक भूमिका मला माझ्या हातून जाऊ द्यायची नव्हती.
अश्रफच्या आयुष्यात तिच्या अनेक छटा आहेत आणि त्या मी पडद्यावर साकारणं हे आवाहानात्मक होत. त्यात माझी अमाप भावनिक आणि मानसिक गुंतवणूक झाली. आशा करते की सिरीज करताना आम्ही जो आनंद अनुभवला तोच आनंद प्रेक्षक सिरीज पाहिल्यावर अनुभवतील आणि आमच्या कामाला नक्कीच योग्य ती दाद देतील.”
अनुजा साठेसह अंकित मोहन, चिन्मय मांडलेकर, राजेंद्र शिरसाटकर, रेशम, अभिजीत चव्हाण, प्रदिप डोईफोडे, विठ्ठल काळे, नाझर खान, विजय निकम, अनिल नगरकर, सुचित जाधव, राजू आठवले आणि संतोष जुवेकर हे ही या वेबसिरीज मध्ये महत्वाच्या भूमिकेत आहेत.