अभिनेते अनुपम खेर यांना बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केले आहे. आज अनुमप खेर यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. पण त्यांनी ही ओळख मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतली. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अनुपम खेर यांनी नुकताच धक्कादायक खुलासा केला आहे. मुंबईत संघर्ष करत असताना त्यांना तुरुंगात एक रात्र काढावी लागली होती, असे त्यांनी सांगितले.
अनुपम खेर यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले की,"मी मुंबईत आलो, तेव्हा माझ्याकडे काम नव्हते. काम मिळावे म्हणून मी इंडस्ट्रीतील लोकांना माझे काम व्हिडीओ कॅसेटच्या माध्यमातून दाखवत असे, त्याआधारे मी कामासाठी विनंती करायचो. एकदा मला ब्रांदा स्टेशनला जायचे होते. तिथे एका व्यक्तीशी माझ व्हिडीओ कॅसेटसंदर्भात काम होतं. वेळेवर पोहोचण्याच्या घाईत मी लोकल रेल्वे रुळ ओलांडला. तर माझी नजर एका गृहस्थावर पडली. त्यांनी मला हात दिला आणि प्लॅटफॉर्मवर चढायला मदत केली. पण, ते साध्या वेशातील पोलिस होते".
पुढे अनुपम यांनी सांगितले की, "जो कोणी चुकीच्या पद्धतीने रूळ ओलांडेल, त्याला पकडण्यासाठी पोलिस साध्या वेशात रेल्वे रुळावर उभे राहायचे. त्यांनी मला अटक केली आणि थेट पोलिस ठाण्यात नेलं. तिथे आधीच जवळपास 50 लोक उभे होते, त्यांचे हात दोरीने बांधलेले होते. पोलिसांनी मलाही रात्रभर कोंडून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी सोडलं. परंतु रेकॉर्डवर ते कोठेही अस्तित्वात नाही".
अनुपम खेर यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ते आगामी टायगर नागेश्वर राव या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. शिवाय, नुकताच त्यांचा 'द व्हॅक्सिन वॉर' प्रदर्शित झाला आहे. तर ते कंगना रणौतसोबत 'इमर्जन्सी' या चित्रपटात दिसणार आहेत, ज्यामध्ये ते जयप्रकाश नारायण यांची भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट यावर्षी 24 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. यामध्ये कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या दोघांशिवाय यात श्रेयस तळपदे, महिमा चौधरी आणि मिलिंद सोमण सारखे कलाकारही दिसणार आहेत.