Anupam Kher ON Satish Kaushik Death : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक सतीश कौशिक आज आपल्यात नाहीत. गेल्या ९ मार्चला सतीश कौशिक यांची प्राणज्योत मालवली. होळी पार्टीसाठी दिल्लीला गेलेल्या कौशिक यांना अचानक हृदय विकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचं निधन झालं. मात्र यानंतर सतीश कौशिक पार्टीसाटी गेलेल्या फार्म हाऊसमधून आक्षेपार्ह औषधे सापडल्याचं समोर आलं. यादरम्यान फार्म हाऊसचा मालक आणि सतीश कौशिक यांचा मित्र विकास मालूची पत्नी सान्वी मालू हिने सतीश यांची हत्या झाल्याचा आरोप करत खळबळ उडवली. सतीश कौशिक यांच्या पत्नी शशी कौशिक यांनी या सगळ्या दाव्यांवर संताप व्यक्त केला होता. आता सतीश यांचे अतिशय जवळचे मित्र अनुपम खेर यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानी याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनुपम खेर यांचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत अनुपम खेर आपल्या मित्राच्या निधनाबद्दल बोलत आहेत.
अनुपम खेर म्हणाले... “मी सतीशचा एक फोटो शोधतोय. यात तो हसत नाहीये. त्याचा दु:खी चेहरा असलेला हा फोटो मी बराच शोधला, पण मला मिळालेला नाही. सतीश आयुष्यभर प्रतिष्ठितपणे जगला. मला वाटतं, आता तो कायमचा गेलाय आणि गेलेल्या माणसाला प्रतिष्ठापूर्वक जाऊ दिलं गेलं पाहिजे. त्याच्या मृत्यूबद्दलच्या अफवा बंद झाल्या पाहिजेत. त्याला प्रेमाने निरोप द्या. त्याच्या आत्म्याला शांती मिळू द्या. या सगळ्या अफवा इथेच संपवा...”, असं अनुपम खेर म्हणाले.सतीश कौशिक व अनुपम खेर हे जिगरी यार होते. कौशिक गेल्यानंतर अनुपम खेर ढसाढसा रडले होते. कालच्या प्रार्थना सभेतही ते भावुक झालेले दिसले. पूर्णवेळ ते कौशिक यांची १० वर्षांची लेक वंशिका हिचा हातात हात घेऊन दिसले.