Join us

'प्रत्येकाला सुरक्षा दिली जाऊ शकत नाही', काश्मिरी पंडितांच्या टार्गेट किलिंगवर अनुपम खेर यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 3:53 PM

जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांना दहशतवाद्यांकडून लक्ष्य केलं जात असल्याच्या मुद्द्यावर बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर यांनी महत्वाचं विधान केलं आहे.

जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांना दहशतवाद्यांकडून लक्ष्य केलं जात असल्याच्या मुद्द्यावर बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर यांनी महत्वाचं विधान केलं आहे. जम्मू-काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांना आजही मारलं जात आहे. गेल्या ३० वर्षांपासून त्यांच्यावर अत्याचार होत आहे. काश्मिरी पंडितांबाबतचा दृष्टीकोन बदलण्याची गरज आपल्याला आहे. काश्मीर फाइल्समुळे लोकांना काश्मिरी पंडितांचं दु:ख समजलं आहे. आम्ही सिनेमा आणला आणि लोकांच्या हृदयात याची ठिणगी पडली, असं अनुमप खेर म्हणाले. 

काश्मिरी पंडितांसोबत अजूनही तेच घडत आहे ही लाजिरवाणी गोष्ट आहे, असे ते म्हणाले. काश्मिरी पंडित काय ते लोक जे जे भारताच्या पाठिशी उभे आहेत त्यांना मारत आहेत. दहशतवादाचा निषेध करावा तितका कमीच आहे. पण यापासून किती जणांचं संरक्षण केलं जाऊ शकतं? प्रत्येकाला संरक्षण दिलं जाऊ शकतं का? लोकांनी आपली मानसिकता बदलली पाहिजे. जे लोक निष्पाप आहे. ज्यांचा काहीच दोष नाही अशा लोकांना टार्गेट केलं जातं हे पाहून माझं मन विषण्ण होतं. तिथं राहणारे एक टक्का लोक तिथं आपलं आयुष्य घालवण्याचा प्रयत्न करत आहेत, कदाचित दहशतवाद्यांचं मनपरिवर्तन होईल, पण असं होऊ शकत नाही, असं अनुपम खेर म्हणाले. 

लोक काश्मीर फाइल्सला काल्पनिक म्हणत होते'काश्मीर फाइल्स'वरुन मला आणि विवेक अग्निहोत्रीला टार्गेट करणार्‍यांनी आधी हे समजून घेतलं पाहिजे की आम्ही हा चित्रपट बनवला तेव्हा त्यांच्या हृदयातील दु:ख जागृत झालं. चित्रपटामुळे त्यांना काश्मिरी हिंदू आणि पंडितांची शोकांतिका दिसू शकी. 'काश्मी फाईल्स' काल्पनिक असल्याचा दावा करणाऱ्या सर्वांच्या तोंडावर आज होत असलेल्या हत्या म्हणजे चपराक आहे, असं अनुपम खेर म्हणाले.  

"5 लाख लोक असे त्यांच्या घराबाहेर फेकले जाऊ शकत नाहीत असं म्हणणाऱ्यांना मी त्याला सांगेन की मी माझ्या आयुष्यात तुमच्यापेक्षा मोठा ढोंगी मी पाहिलेला नाही. दहशतवादी कधीच यशस्वी होणार नाहीत कारण स्वातंत्र्यदिनी काय झाले ते आम्ही पाहिलं आहे. काश्मीर खोऱ्यात जितके झेंडे, स्वातंत्र्य आणि विकास होईल तितकंच हे लोक हैराण होतील", असंही खेर म्हणाले. 

हत्येविरोधात लोकांची निदर्शनंगेल्या ९० दिवसांपासून काश्मीरमध्ये पंडितांच्या हत्येविरोधात लोक निदर्शनं करत आहेत. काश्मीरी पंडितांना जम्मूमध्ये सन्मानानं राहता यावं अशी त्यांची मागणी आहे. आजच्या घटनेनंतर लोकांनी पुन्हा निदर्शनं केली. काश्मीरमधील परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे काश्मिरी पंडितांना जम्मूमध्ये सुरक्षित ठिकाणी हलवावं आणि सरकारनं पंडितांवर होणारे हल्ले थांबवावेत, असं त्यांचं म्हणणं आहे. काश्मिरी पंडित अशोक धर म्हणाले की, काश्मीरी मुलांना बळीचा बकरा बनवू नका, असं आम्ही सरकारला अनेकदा सांगितलं आहे. आजही एकाचा खून झाला आहे. माझी मुलं काश्मीरला जाणार नाहीत, आम्ही त्यांना पाठवणार नाही. 

टॅग्स :अनुपम खेरजम्मू-काश्मीर