Join us

म्हणे,‘द एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’चा ट्रेलर You Tubeवरून ‘गायब’; भडकले अनुपम खेर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2019 2:35 PM

नुकताच ‘द एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि या ट्रेलरनंतर भाजपा विरूद्ध काँग्रेस यांच्यात नवा वाद रंगला. याचदरम्यान अनुपम खेर यांनी ‘द एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’चा ट्रेलर ‘यू ट्युब’वरून ‘गायब’ असल्याचा दावा केला आहे.

ठळक मुद्दे येत्या ११ जानेवारीला हा चित्रपट चित्रपटगृहांत येत आहे. अनुपम खेर यांच्याशिवाय अक्षय खन्ना, अर्जुन माथुर, बिपीन शर्मा, दिव्या सेठी यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. अक्षय खन्नाने यात संजय बारू यांची व्यक्तिरेखा साकारली आहे.

अनुपम खेर यांचा आगामी चित्रपट ‘द एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ राजकीय वादात अडकला आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे तत्कालीन मीडिया सल्लागार संजय बारू यांच्या पुस्तकावर आधारित या चित्रपटात अनुपम खेर मुख्य भूमिकेत आहेत. मनमोहन सिंग यांची व्यक्तिरेखा ते साकारत आहेत. तूर्तास काँग्रेसने या चित्रपटाला जोरदार विरोध चालवला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि या ट्रेलरनंतर भाजपा विरूद्ध काँग्रेस यांच्यात नवा वाद रंगला. हा चित्रपट माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेसची बदनामी करणारा असल्याचा दावा, काँग्रेसकडून होत आहेत. याचदरम्यान अनुपम खेर यांनी ‘द एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’चा ट्रेलर ‘यू ट्युब’वरून ‘गायब’ असल्याचा दावा केला आहे.

होय, ‘द एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’चा ट्रेलर ट्रेंडमध्ये आहे. पण अनेक चाहत्यांची हा ट्रेलर यु ट्यूबवर दिसत नसल्याची तक्रार नोंदवल्याचे अनुपम खेर यांनी म्हटले आहे. ‘डियर युट्यूब, मला फोन व मॅसेज येत आहेत की, देशाच्या अनेक भागात युट्यूबवर द एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर ट्रेलर सर्च केल्यानंतर काहीही दिसत नाही किंवा ‘द एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’चा ट्रेलर ५० व्या स्थानावर आहे. आम्ही नंबर १वर ट्रेंड करत आहोत. कृपया मदत करा, ’असे ट्वीट अनुपम खेर यांनी केले आहे. आपल्या या ट्वीटसोबत त्यांनी चाहत्यांनी पाठवलेल्या मॅसेजचे स्क्रिनशॉटही शेअर केले आहेत.

दरम्यान ‘द एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’चा ट्रेलर रिलीज झाल्यापासून आत्तापर्यंत कोट्यवधी लोकांनी तो पाहिला आहे. येत्या ११ जानेवारीला हा चित्रपट चित्रपटगृहांत येत आहे. अनुपम खेर यांच्याशिवाय अक्षय खन्ना, अर्जुन माथुर, बिपीन शर्मा, दिव्या सेठी यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. अक्षय खन्नाने यात संजय बारू यांची व्यक्तिरेखा साकारली आहे.

टॅग्स :द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टरमनमोहन सिंगअक्षय खन्नाअनुपम खेर