Join us

'त्यांना काश्मीरला त्यांच्या घरी जायचं होतं'; अनुपम खेर यांनी सांगितली वडिलांची शेवटची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2022 5:33 PM

Anupam kher: 'द काश्मीर फाइल्स'च्या निमित्ताने आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर सध्या त्यांच्या द काश्मीर फाइल्स या चित्रपटामुळे चर्चेत येत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय, अत्याचार उलगडण्यात आला आहे. विशेष म्हणजे अवघ्या काही दिवसात बॉक्स ऑफिसवर राज्य करणाऱ्या या चित्रपटावर सामान्यांपासून ते सेलिब्रिटी आणि राजकीय व्यक्तींपर्यंत अनेकांनी त्यांची मतं दर्शविली आहेत. यामध्येच आता अनुपम खेर यांनी एक पोस्ट शेअर करत या चित्रपटाविषयी आणि त्यांच्या वडिलांविषयी एक भाष्य केलं आहे.

कलाविश्वाप्रमाणेच अनुपम खेर यांचा सोशल मीडियावरही वावर असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे अनेकदा समाजात घडणाऱ्या किंवा त्यांच्या चित्रपटाविषयी ते व्यक्त होत असतात. यावेळी त्यांनी 'द काश्मीर फाइल्स'च्या निमित्ताने आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. सोबतच हा चित्रपट आपल्या वडिलांना डेटिकेट केला आहे.

अनुपम खेर यांनी त्यांच्या दिवंगत वडिलांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा त्यांच्या वडिलांसोबतचा अखेरचा फोटो असल्याचं त्यांनी फोटोच्या कॅप्शनमध्ये नमूद केलं आहे.

"हा माझे वडील पुष्करनाथ जी यांचा शेवटचा फोटो. ११ व्या दिवशी त्यांचं निधन झालं. या पृथ्वीतलावर सर्वात प्रमाणिक आणि सरळमार्गी व्यक्ती म्हणजे तेच. त्यांनी कधीच कोणाचं मनं दुखावलं नाही. ते सामान्य व्यक्ती होते. पण, त्याचसोबत एक असामान्य वडीलदेखील. त्यांना त्यांच्या काश्मीरच्या घरी जायचं होतं. त्यामुळे हा चित्रपट मी त्यांना समर्पित करतो", अशी पोस्ट अनुपम खेर यांनी लिहिली आहे.

दरम्यान, द काश्मीर फाइल्स हा चित्रपट ११ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने आतापर्यंत २५३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटात अनुपम खेर यांच्या व्यक्तीरिक्त मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी या दिग्गज कलाकारांनीही स्क्रीन शेअर केली आहे.

टॅग्स :अनुपम खेरबॉलिवूडसेलिब्रिटीद काश्मीर फाइल्स