मुंबई: 1990मध्ये काश्मीरमध्ये झालेल्या नरसंहारावर आधारित ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळत असून, चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर बक्कळ कमाई केली आहे. अनेकजण या चित्रपटाचे कौतुक करत आहेत, तर काहीजण याला समाजात फूट पाडणारा आणि मुस्लिमांबद्दल द्वेष पसरवणारा चित्रपट म्हणत आहेत. दरम्यान, त्या सर्वांना अभिनेता अनुपम खेर यांनी एक व्हिडिओ शेअर करत सडेतोड उत्तर दिले आहे.
अनुपम खेर यांनी 19 वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये झालेल्या 24 जणांच्या हत्येचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात सांगण्यात येत आहे की, संशयित दहशतवादी लष्कराच्या गणवेशात आले आणि त्यांनी 24 हिंदूंना घरातून बाहेर काढून गोळ्या झाडल्या. ही घटना अल्पसंख्याकांवर झालेला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला असल्याचेही सांगितले जात आहे. या घटनेत दोन मुले, 11 पुरुष आणि 11 महिलांचा मृत्यू झाला होता. हीच घटना ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटातही दाखवली आहे.
व्हिडिओ शेअर करत अनुपम खेर यांनी लिहिले की, "हे हत्याकांड 19 वर्षांपूर्वी घडले होते. जे लोक काश्मिरी हिंदूंच्या हत्याकांडावर चुकीचे वक्तव्य करत आहेत किंवा #TheKashmirFiles ला प्रोपगंडा चित्रपट म्हणत आहेत, त्यांनी एपी न्यूजचा हा व्हिडिओ पाहावा. दहशतवाद्यांनी 24 निरपराधांची निर्घृण हत्या केली होती. त्यांची माफी मागा, पश्चात्ताप करा, त्या जखमा पून्हा ताज्या करू नका."