Anupam Kher 'Vijay 69' Movie :अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) एका आगळ्यावेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटाचं कथानक एका ६९ वयाच्या व्यक्तीच्या जीवनावर आधारलेलं आहे. अनुपम खेर मुख्य भूमिकेत असलेल्या 'विजय 69' चित्रपटात त्यांचा वेगळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर समोर आला आहे.
प्रत्येक माणसाची इच्छा असते की, जेव्हा तो या जगातून निघून जाईल तेव्हा त्याच्या चांगल्या कामामुळे तो लोकांच्या स्मरणात राहावा. लोक त्याला विसरता कामा नये. अशाच विचारधारेचे विजय असतात. या जगाचा निरोप घेण्याआधी काहीतरी वेगळं करण्याची जिद्द या गृहस्थाला झोपू देत नाही. जर एखाद्याने म्हातारा म्हटलं तर त्यांना या गोष्टीचा प्रचंड राग येतो. या चित्रपटात अभिनेते चंकी पांडे अनुपम खेर यांच्या मित्राच्या भूमिकेत पाहायला मिळतायत.
अनुपम खेर यांच्या 'विजय 69' या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ते लहान मुलासारखे हट्टी आणि नव्या पिढीवर रागावताना दिसत आहेत. आपलं वय वाढलं आहे, हे सत्य स्वीकारायला ते अजिबात तयार नसतात. दरम्यान, विजय त्यांचा मित्र चंकी पांडेला सांगतात की त्यांनी त्यांच्या आयुष्यात असे काही केलं पाहिजे ज्यासाठी लोक त्यांना लक्षात ठेवतील.काहीतरी वेगळं करण्याच्या नादात विजय ट्रायथलॉन मध्ये सहभागी होतात. वयाच्या ६९ वर्षी स्पर्धेत भाग घेऊन नवा विक्रम आपल्या नावे करण्याची त्यांची जिद्द असते. लोकांना वाटतं की म्हातारा वेडा झाला आहे. त्यांना ट्रायथलॉन पूर्ण करून नवीन विक्रम घडवायचा आहे, या निर्णयावर ते ठाम असतात. यावर चंकी पांडे आणि त्याचे इतर मित्र अनुपम खेर यांची खिल्ली उडवतात. एके दिवशी सायकल चालवत असताना त्याची तब्येत अचानक बिघडते आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागतं. त्यामुळे त्यांचं स्वप्न अर्धवट राहतं. तरीही ते हार न मानता पुन्हा नव्याने सुरूवात करतात. पण तो पराभव ते स्वीकारत नाहीत आणि आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करतात.
अनुपम खेर यांच्या 'विजय 69' या चित्रपटाचे दिग्दर्शन अक्षय रॉय यांनी केले असून चित्रपटाची कथाही त्यांनीच लिहिली आहे. दरम्यान, मनीष शर्मा या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. हा चित्रपट ८ नोव्हेंबर रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे.