The Kashmir Files Box Office Collection Day 4: दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचा ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files ) या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. अगदी सोशल मीडियापासून बॉक्स ऑफिसपर्यंत सध्या याच चित्रपटाची हवा आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सुपरडुपर ब्लॉकबस्टर ठरला आहे. माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर या चित्रपटाने देशभरातील लोकांना चित्रपटगृहांकडे वळण्यास भाग पाडलं आहे.
या आठवड्यात रिलीज झालेला प्रभास सारख्या सुपरस्टारचा ‘राधेश्याम’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर गर्दी खेचण्यात अपयशी ठरला असताना ‘द काश्मीर फाइल्स’नं जोरदार मुसंडी मारली आहे. गेल्या शुक्रवारी हा सिनेमा रिलीज झाला आणि काल सोमवारपर्यंत या सिनेमानं 42.20 कोटींचा गल्ला जमवला.
‘द काश्मीर फाइल्स’ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 3.55 कोटींची कमाई केली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी ‘द काश्मीर फाइल्स’च्या कमाईचा आकडा 3.55 कोटीवरून थेट 8.50 कोटींवर गेला. रविवारी या चित्रपटाने 15.10 कोटींचा बिझनेस केला आणि काल सोमवारी 15.05 कोटींचा गल्ला जमवला. चारच दिवसांत या चित्रपटाने एकूण 42.20 कोटींची कमाई केली आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ लवकरच 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट भारतात एकूण 561 चित्रपटगृहात, 113 परदेशातील स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. कमी स्क्रीन मिळूनही या चित्रपटाने चांगला व्यवसाय केला आहे.
हा चित्रपट 1990 च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार, चिन्मय मांडलेकर अशी तगडी स्टारकास्ट आहे.