लता मंगेशकर, आशा भोसले या दिग्गज गायिकांचा बॉलिवूडमध्ये दबदबा होता, अशा काळात एक गोड आवाज म्युझिक इंडस्ट्रीत दाखल झाला आणि बघता बघता या आवाजाने सर्वांनाच भुरळ घातली. हा आवाज होता गायिका अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal) यांचा. लता दीदी, आशा दीदींशी तगडी स्पर्धा होती. पण अशाही परिस्थितीत अनुराधा पौडवाल यांनी स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं. इतकं की नव्वदच्या दशकात बॉलिवूडच्या जवळपास प्रत्येक सिनेमांमध्ये अनुराधा पौडवाल यांचे एक तरी गाणे असायचेच. पण अचानक काही वर्षानंतर अनुराधा यांनी फिल्मी गाणी गायचे सोडून भक्ती गीत व भजन गायला सुरूवात केली. असं का? असा प्रश्न आजही त्यांच्या चाहत्यांना छळतो. अलीकडे ‘द कपिल शर्मा शो’मध्ये खुद्द अनुराधा यांनी याचा खुलासा केला.
बॉलिवूडमध्ये तुम्ही एकापेक्षा एक हिट गाणी गायलीत. मग अचानक इंडस्ट्री सोडून भजनांकडे कशा वळलातं? असा थेट प्रश्न कपिल शर्माने त्यांना केला. यावर अनुराधा यांनीही थेट उत्तर दिलं.
‘बॉलिवूडमध्ये डायरेक्टर आणि प्रोड्यूसर यांच्या मूडनुसार किंवा मग एखादा सिनेमामुळे हिट झालेल्या हिरो-हिरोईनच्या मर्जीनुसार गाणी मिळत होती. हे सगळं मला थोडं असुरक्षित वाटू लागलं होतं आणि भक्तिगीतांकडे सुरुवातीपासूनच भक्तिगीते गाण्याकडे माझा कल होता. त्यामुळे बॉलिवूड सोडून भक्तीगीतं गाण्यास मी सुरुवात केली. आशिकी, दिल है की मानता नहीं या चित्रपटातील गाणी हिट झाली होती. करिअर पीकला असताना अचानक मी भक्तीसंगीताकडे वळले होते. काहींना कदाचित माझा हा निर्णय चुकीचा ही वाटत असेल. पण मी माझ्या आयुष्यात समाधानी आहे. काम करण्याची प्रत्येकाची अशी वेगळी पद्धत असते. त्यामुळे कोण चूक किंवा कोण बरोबर हे आपण ठरवू शकत नाही,’ असं त्या म्हणाल्या.