मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा एका प्रसिद्ध बंगाली वृत्तपत्रावर चांगलीच भडकली. त्या प्रसिद्ध बंगाली वृत्तपत्रात छापलेली अनुष्काची खोटी मुलाखत तिच्या भडकण्याचं कारण आहे. वृत्तपत्राने अनुष्काशी बोलून तिची मुलाखत छापल्याचा दावा केला तर दुसरीकडे त्या वृत्तपत्राला कधीही मुलाखत दिली नसल्याचं अनुष्काने म्हंटलं आहे. मुलाखत ज्या वृत्तपत्राने छापली त्या वृत्तपत्र समुहाकडे मी कधीही माझ्या खासगी आयुष्याबद्दल काहीही बोलली नसल्याचं अनुष्काने स्पष्ट केलं.
Ei Samay या बंगाली वृत्तपत्राने विराट कोहली व अनुष्का शर्माचा फोटो छापला आहे. 'काही गोष्टी अशाच घडतात. हा फोटो त्यापैकीच एक आहे', अशी प्रतिक्रिया त्या फोटोबद्दल अनुष्काने दिल्याचं वृत्तपत्राने नमूद केलं आहे. पण प्रत्यक्षात अशी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नसल्याचं अनुष्काने खडसावून सांगितलं आहे. अनुष्का शर्माने वृत्तपत्रातील मुलाखतीचं कटिंग ट्विटरवर पोस्ट करत नाराजी व्यक्त केली. 'हे अतिशय हैराण करणार आहे. 'मी कधीही न दिलेली मुलाखत एका प्रतिष्ठित वृत्तपत्राने छापली आहे. मी माझ्या खासगी आयुष्याबद्दल संबंधित वृत्तपत्राला किंवा इतर कुठल्याही वृत्तपत्राला कधीच मुलाखत दिली नाही. स्वातंत्र्याचा वापर तुम्ही किती बेजबाबदारपणे केला जातो', असं ट्विट अनुष्काने केलं आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असताना विराट कोहलीने अनुष्कासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्याच फोटोवरून ही मुलाखत छापण्यात आली. अनुष्काने ट्विटरवरून वृत्तपत्राच्या वर्तनाबद्दल खडसाविल्यानंतर तिच्या चाहत्यांनीही वृत्तपत्राच्या या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली. बंगालमध्ये सगळ्यात जास्त खप असणारं वृत्तपत्र अशी चूक कशी करू शकतं? असा प्रश्न नेटिझन्सने उपस्थित केला आहे.