मुंबई: हेराफेरी अनेकांच्या आवडीचा चित्रपट आहे. हेराफेरी, फिर हेराफेरी चित्रपटांनी कोट्यवधी प्रेक्षकांना खळखळून हसवलं. हेराफेरीचे दोन पार्ट आतापर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. राजू, श्याम आणि बाबू भय्या या पात्रांनी रसिकांच्या मनात स्थान मिळवलं. अनेकांना तर हे दोन्ही चित्रपट अगदी तोंडपाठ आहेत. हेराफेरीचा तिसरा भाग कधी येणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. मात्र त्याआधी अभिनेते परेश रावल यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे.
हेराफेरीच्या दोन भागांमध्ये परेश रावल, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी प्रमुख भूमिकेत दिसले. हेराफेरी चित्रपट २००० मध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाला दणदणीत यश मिळालं. त्यामुळे निर्मात्यांनी फिर हेराफेरीची घोषणा केली. हेराफेरीचा दुसरा भाग २००६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. फिर हेराफेरीलादेखील बॉक्स ऑफिसवर उत्तम यश मिळालं. त्यामुळे आता चाहत्यांना तिसऱ्या भागाची उत्सुकता आहे.
परेश रावल यांना हेराफेरीच्या सिक्वेलबद्दल विचारण्यात आलं. 'प्रामाणिकपणे बोलायचं झाल्यास माझ्या मनात भूमिकेबद्दल कोणतीही उत्कंठा नाही. भूमिकेचा बॅकड्रॉप वेगळा नसल्यास मला कोणतीही उत्सुकता नसेल. मला त्याच प्रकारे धोतरं नेसायचंय, चश्मा घालून चालायचंय, सगळं आधीसारखंच करायचंय, तर मग मी त्यासाठी जास्त पैसे घेईन,' असं रावल म्हणाले.
भूमिकेत कोणतंच नावीण्य नसेल, तर ती करण्यात फारशी मजा नाही. अशा परिस्थितीत मी जास्त पैसे घेईन. आम्ही कित्येक वर्षांनंतर तेचतेच विनोद घेऊन आलो, तर तो सिक्वेल यशस्वी होणार नाही. कहाणीत काहीतरी नवीन असायला हवं. तरच त्या भूमिकेबद्दल उत्कंठा वाटेल, असं रावल यांनी सांगितलं.