सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर दोन अज्ञात इसमांनी गोळीबार केला. त्यामुळे सलमान खान आणि कुटुंबियांना मोठा धक्का बसला. हा गोळीबार झाल्यावर खान कुटुंबाचे हितचिंतक आणि सलीम खान यांची प्रतिक्रिया समोर आली. परंतु सलमान, सोहेल, अरबाज या तिघांपैकी कोणीही काही प्रतिक्रिया दिली नव्हती. अशातच काल रात्री उशीरा अरबाज खानने इन्स्टाग्राम पोस्ट करत त्याची अधिकृत प्रतिक्रिया दिलीय.
अरबाज लिहितो, "सलीम खान कुटुंबीयांचे निवासस्थान असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची नुकतीच घडलेली घटना अत्यंत अस्वस्थ करणारी आहे. या धक्कादायक घटनेमुळे आमचे कुटुंब हादरले. सलीम खान आणि कुटंबाच्या कोणत्याही सदस्याने या घटनेबाबत मीडियामध्ये कोणतेही वक्तव्य केले नाही. आम्हाला मुंबई पोलिसांवर विश्वास आहे आणि आमच्या कुटुंबाची सुरक्षा आणि सुरक्षितता निश्चित करण्यासाठी ते त्यांच्या सामर्थ्याने सर्वकाही करतील असे आश्वासन देण्यात आले आहे."
अरबाज पुढे लिहितो, "'दुर्दैवाने आमच्या कुटुंबाच्या जवळ असल्याचा दावा करणारे आणि खान कुटुंबाचे प्रवक्ते असल्याचं भासवणारे काही लोक प्रसारमाध्यमांमध्ये बेछूट वक्तव्यं करत आहेत. हा सगळा पब्लिसिटी स्टंट आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण अशा वक्तव्यांचा कुटुंबावर कोणताही परिणाम होणार नाही. खान कुटुंबाने या घटनेबाबत मीडियामध्ये कोणतेही वक्तव्य दिलेले नाही, हे लक्षात घ्या." दरम्यान गोळीबार करणाऱ्यांना दोन्ही आरोपींना पोलिसांनी गुजरातमधून अटक केली आहे.