'नृत्यकला निकेतन'च्या संचालिका गुरू अर्चना पालेकर यांना त्यांच्या भरतनाट्यम क्षेत्रातील ४१ वर्षांहून अधिक कारकिर्दीतील उल्लेखनीय योगदान तसेच भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्याच्या प्रचार आणि प्रसाराबद्दल 'मदर इंडिया' या पुरस्काराने मुंबईतील चर्नीरोडच्या ऑपेरा हाऊस थिएटरमध्ये सन्मानित करण्यात आले. यावेळी निर्माता-दिग्दर्शक केदार शिंदे, रश्मी ठाकरेसह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. युवा व्हिजनच्या 'मदर इंडिया' पुरस्कार सन्मान सोहळ्यात नृत्यकला निकेतन'च्या ३६ विद्यार्थीनींनी महाराष्ट्र गीतावर भारतनाट्यमचं सादरीकरण करीत गुरू अर्चना पालेकर यांना अनोखी गुरू दक्षिणा वाहिली.
त्याची नोंद 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली. त्याचे सन्मानचिन्ह आणि नियुक्ती पत्र गुरू अर्चना पालेकर आणि या संपूर्ण कार्यक्रमाच्या नृत्य दिग्दर्शिका मयुरी खरात यांना देण्यात आले. सोहळयात 'शिवतांडव स्तोत्र, महिषासूर मर्दिनी स्तोत्र, स्वामी तारक मंत्रावर भरत नाट्यमचे सादरीकरण करण्यात आले. तसेच महाराष्ट्र राज्य गीत 'जय जय महाराष्ट्र माझा... ' यावर 'नृत्यकला निकेतन'च्या ३६ विद्यार्थीनींनी ३. ३६ सेकंदाचे भारतनाट्यमचे सादरीकरण केले. नृत्यप्रेमींसाठी ही अनोखी पर्वणी होती.
"प्रत्येक गुरूला एक चिंता असते की, माझा वारसा कोण चालवणार? पण मला याची चिंता नाही. कारण मी दोन पिढयांना घडवलेले आहे. इथे मला माझी मुलगी नृत्य दिग्दर्शिका मयुरी खरात आणि माझी नात मानसी खरात खरात यांचा उल्लेख करावा वाटतोय. 'नृत्यकला निकेतन'चा वारसा त्या जपातीलच. शिवाय दर्जेदार विद्यार्थीनीही घडवतील याची खात्री आहे, असेही गुरू अर्चना पालेकर अभिमानाने बोलल्या.