‘कुछ कुछ होता हैची मिस ब्रिगेंजा असो की‘राजा हिंदुस्तानी’मधील करिश्मा कपूरची सावत्र आई अर्चना पुरण सिंग प्रत्येक भूमिकेत अगदी फिट बसते. टेलिव्हिजन, चित्रपट ते कॉमेडी शो अशा सगळ्यांत अर्चनाने काम केले. हे सांगायचे कारण म्हणजे, आज अर्चनाचा वाढदिवस. 26 सप्टेंबर 1962 रोजी जन्मलेल्या अर्चनाने अभिनेता आदित्य पांचोलीसोबत आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर नसिरूद्दीन शहा यांच्यासोबत‘जलवा’चित्रपटात ती झळकली. हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला होता. अग्निपथ, सौदागर, शोला और शबनम, आशिक आवारा, राजा हिंदुस्तानी अशा अनेक चित्रपटांत काम करणारी अर्चना सध्या‘द कपिल शर्मा शो’मध्ये जजची भूमिका साकारते आहे.
द कपिल शर्मा शोमध्ये काही दिवसांपूर्वी अनुपम खेर यांनी वन डे या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावली होती. अनुपम आणि अर्चना यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. या कार्यक्रमात अर्चना पुरण सिंगने दीपक शिवदासानी दिग्दर्शित‘लडाई’चित्रपटाच्या आठवणी सांगितल्या. या चित्रपटात तिच्यासोबत मिथुन चक्रवर्ती, रेखा, डिंपल कपाडिया, अनुपम खेर हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटातील एका प्रसंगाविषयी अर्चना सांगितले होते की, “आम्ही‘लडाई’चित्रपटासाठी शूटिंग करत होतो. या चित्रपटात माझे आणि अनुपमचे किसिंग दृश्य असावे असे दीपकचे म्हणणे होते. मला जेव्हा हे समजले तेव्हा मी घाबरले होते... कारण मी पडद्यावर यापूर्वी कधीच असे दृश्य दिले नव्हते. मी दीपकला फोन करून सांगितले की, मी ते करू शकणार नाही. त्यामुळे ते दृश्य चित्रीत झालेच नाही.”