बॉलिवूडमधील एव्हरग्रीन ठरलेला चित्रपट म्हणजे 'कुछ कुछ होता हैं'. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता. विशेष म्हणजे आजही या चित्रपटाची लोकप्रियता कमी झालेली नाही. या चित्रपटातील मिस्टर मल्होत्रा आणि मिस ब्रिगेंजा यांची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना विशेष भावली होती. या भूमिका अभिनेता अनुपम खेर आणि अर्चना पूरणसिंग यांनी साकारली होती. विशेष म्हणजे या चित्रपटाव्यतिरिक्त या जोडीने अन्य एका चित्रपटातही काम केलं आहे. मात्र, या चित्रपटात अर्चना पूरणसिंगने अनुपम खेर यांच्यासोबत ऑनस्क्रीन किसिंग सीन देण्यास नकार दिला होता.
१९८९ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'लडाई' या चित्रपटात अनुपम खेर आणि अर्चना पूरणसिंग यांनी एकत्र स्क्रीन शेअर केली होती. मात्र, या चित्रपटात ऑनस्क्रीन किसिंग सीन देण्यास अर्चना पूरणसिंगने नकार दिला होता. अलिकडेच 'द कपिल शर्मा शो' मध्ये तिने या गोष्टींचा खुलासा केला असून त्या मागचं कारणही सांगितलं आहे.
"ज्यावेळी आम्ही लडाई चित्रपटाचं चित्रीकरण करत होतो त्यावेळी दीपक शिवदसानीने ( दिग्दर्शक) अचानकपणे किसिंग सीनचा प्लॅन आखला. ज्यावेळी मला या सीनविषयी समजलं त्यावेळी मी पूरती गोंधळून गेले होते. मला खूप टेन्शन आलं होतं. त्यामुळे मी दिपकला फोन करुन मला हा सीन जमणार नाही सांगितलं. त्यानंतर काय झालं मला माहित नाही.पण, या सीनचा पूर्ण सिक्वेन्सचं चित्रपटातून हटवण्यात आला", असं अर्चना पूरणसिंग म्हणाली.
दरम्यान, अर्चनाचं म्हणणं ऐकल्यानंतर कपिल शर्मा शोमध्ये उपस्थित असलेल्या अनुपम खेर यांनीदेखील या चित्रपटाविषयी त्यांचं मत मांडलं. ''किरण खेरसोबत लग्न झाल्यानंतर तुम्हाला किसिंग सीन देतांना भीती वाटू लागली होती का?'' असा मजेशीर प्रश्न अर्चनाने अनुपम खेर यांना विचारला. त्यावर ''मला किरणची भीती वाटत नाही. परंतु, त्यावेळी तो किसिंग सीन करताना तुम्ही कन्फर्टेबल नव्हतात. त्यामुळे मी दिपकला फोन करुन तो पूर्ण सिक्वेन्स कट करण्याची विनंती केली होती'', असं अनुपम खेर म्हणाले.