Join us

Arijit Singh : व्हेंटिलेटरवर असलेल्या 'या' अभिनेत्रीच्या रुग्णालयाचं बिल 12 लाख; अरिजीत सिंहने दिला मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 12:24 PM

Arijit Singh And Aindrila Sharma : एंड्रिलाच्या हॉस्पिटलचा खर्चही वाढत आहे आणि तो 12 लाखांच्या पुढे गेला आहे. अशा परिस्थितीत तिच्या कुटुंबीयांनी कोणाकडे आर्थिक मदतीची मागणी केलेली नाही. पण गायक अरिजीत सिंह याने मदतीचा हात पुढे केला.

बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री एंड्रिला शर्मा (Aindrila Sharma) हिच्या प्रकृतीविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मल्टीपल कार्डियक अरेस्टनंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या अभिनेत्रीला व्हेंटिलेटरवर ठेवलं आहे. कार्डियक अरेस्ट इतका गंभीर होता की तिला अनेक वेळा सीपीआर द्यावा लागला. सध्या एंड्रिलाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. अभिनेत्रीला यापूर्वीही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ब्रेन स्ट्रोकमुळे अभिनेत्रीवर शस्त्रक्रियाही करावी लागली. एंड्रिलाची प्रकृती इतकी गंभीर आहे की, अभिनेत्री आता मृत्यूशी झुंज देत आहे.

एंड्रिलाच्या हॉस्पिटलचा खर्चही हळूहळू वाढत आहे आणि तो तब्बल 12 लाखांच्या पुढे गेला आहे. अशा परिस्थितीत तिच्या कुटुंबीयांनी कधीच कोणाकडे आर्थिक मदतीची मागणी केलेली नाही. पण आता गायक अरिजीत सिंह (Arijit Singh) याने मदतीचा हात पुढे केला. एंड्रिला शर्माप्रमाणेच अरिजीत हा देखील पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादचा आहे आणि टीव्ही अभिनेत्रीची प्रकृती गंभीर असल्याचं समजल्यावर त्याने हा पुढाकार घेतला. अरिजीतने तिला पुढील उपचारासाठी राज्याबाहेर नेले तर तो तिच्या हॉस्पिटलचा सर्व खर्च उचलेल असं म्हटलं आहे. 

कॅन्सरशी लढाई जिंकल्यानंतर मल्टीपल कार्डियक अरेस्ट

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीला अनेकदा हृदयविकाराचा झटका आला आहे. अनेक हृदयविकाराच्या झटक्यांमुळे अभिनेत्रीची प्रकृती सध्या अत्यंत नाजूक आहे. ती सध्या व्हेंटिलेटरवर आहे. सर्वजण अभिनेत्रीच्या लवकरात लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. काही दिवसांपूर्वी एंड्रिलाला स्ट्रोक आला होता. तिच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या (ब्लड क्लॉट्स) जमा झाल्या आहेत. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा देखील एंड्रिलाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आणि त्यानंतर तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले होते.

दोनदा कॅन्सरशी केला सामना 

एंड्रिलाने याआधी दोनदा कॅन्सरशी सामना केला आणि तो लढा जिंकला आहे. यानंतर आता ती पुन्हा व्हेंटिलेटर असल्याच्या बातमीने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्रीची आता प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे तिचे संपूर्ण कुटुंब आणि चाहते अतिशय दुःखी आहे. मित्र-मैत्रिणी आणि चाहते ती लवकर बरी व्हावी म्हणून प्रार्थना करत आहेत. एंड्रिलाने दोन ओटीटी प्रोजेक्टमध्ये काम केले आहे. 'झुमुर' या टीव्ही शोमधून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर अनेक लोकप्रिय शोमध्ये काम केले. Jibon Jyoti, ‘Jiyon Kathi’ मध्ये ती मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :अरिजीत सिंहहॉस्पिटल