श्रीदेवी आणि अर्जुन कपूर यांच्यात कधीच आलबेल नव्हते. अर्जुनचे वडील बोनी कपूर यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन श्रीदेवीशी लग्न केले होते. बोनी आणि त्याच्या पहिल्या पत्नीचा घटस्फोट झाला, त्यावेळी अर्जुन आणि त्याची बहीण अंशुला खूपच लहान होते. त्यांच्या आईनेच त्यांचे पालनपोषण केले. काही वर्षांपूर्वी अर्जुनच्या आईचे कर्करोगाने निधन झाले. या सगळ्या परिस्थितीमुळे अर्जुनने श्रीदेवीला कधीच स्वीकारले नाही. मीडियामध्ये देखील तो श्रीदेवीविषयी बोलणे टाळतच असे. पण श्रीदेवी यांच्या मृत्युनंतर तो खुशी आणि जान्हवी या त्यांच्या मुलींच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिला.
श्रीदेवी यांचे निधन दुबईत झाले. त्यांच्या निधनाच्या वेळी बोनी कपूर त्यांच्यासोबतच होते. अर्जुनला श्रीदेवी यांच्या निधनाबाबत कळल्यानंतर तो लगेचच दुबईला रवाना झाला होता. काही जवळच्या लोकांच्या सांगण्यावरून अर्जुनने दुबईला जाण्याचा निर्णय घेतला होता. याविषयी अर्जुनने स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, अर्जुनने त्या मुलाखतीत अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे.
तो सांगतो, श्रीदेवी यांचे निधन होईल याचा मी कधी स्वप्नात देखील विचार केला नव्हता. मला ही बातमी कळल्यानंतर काय करायचे हे काहीच सुचत नव्हते. माझे मन एकदम सुन्न झालं होते. मी माझी मावशी अर्चना शौरीला फोन केला आणि मी काय करू असे तिला विचारले. त्यावर तुला जे योग्य वाटते ते तू कर असा सल्ला मावशीने दिला. त्यानंतर मी अंशुलाशी बोललो. माझी मावशी आणि अंशुला यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी दुबईला जाण्याचा निर्णय घेतला. खुशी आणि जान्हवी यांच्यासाठी तो अतिशय वाईट काळ होतो. माझ्या मनाला जे योग्य वाटले ते मी केले. यापुढे देखील खुशी आणि जान्हवीला माझी आणि अंशुलाची गरज असेल तेव्हा आम्ही दोघे त्यांच्या पाठिशी उभे असू.
श्रीदेवी यांचे निधन झाले त्यावेळी अर्जुन नमस्ते लंडन या चित्रपटाचे चित्रीकरण करत होता. श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी कळताच चित्रीकरण सोडून तो दुबईला रवाना झाला होता.