Varisu vs Kuttey : पुन्हा एकदा साऊथचा सिनेमाच मारणार बाजी? ‘वरिसु’ने केली ‘कुत्ते’पेक्षा जास्त कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 03:18 PM2023-01-16T15:18:52+5:302023-01-16T15:19:47+5:30
Varisu vs Kuttey : साऊथ चित्रपटांनी आधीच बॉलिवूडला घाम फोडला आहे. अशात नुकताच रिलीज झालेला ‘वरिसु’ पुन्हा एकदा अर्जुन कपूरच्या ‘कुत्ते’वर भारी पडताना दिसतोय.
Varisu vs Kuttey : साऊथ चित्रपटांनी आधीच बॉलिवूडला घाम फोडला आहे. अशात नुकताच रिलीज झालेला ‘वरिसु’ पुन्हा एकदा अर्जुन कपूरच्या ‘कुत्ते’वर भारी पडताना दिसतोय. थलपती विजयच्या ‘वरिसु’चा तामिळ व्हर्जनने पहिल्या पाच दिवसांतच १०० कोटींचा आकडा गाठला आहे. हिंदी व्हर्जनही गर्दी खेचतोय. ‘कुत्ते’ची अवस्था मात्र फार काही चांगली नाही.
‘कुत्ते’ची संथ सुरूवात
#Kuttey has a slow start on Day 1… Gathered pace in the evening shows at premium multiplexes… Needs to see a miraculous turnaround on Day 2 and 3… Fri ₹ 1.07 cr. #India biz. pic.twitter.com/RwFDyEZ87q
— taran adarsh (@taran_adarsh) January 14, 2023
‘कुत्ते’ हा सिनेमा गेल्या शुक्रवारी रिलीज झाला. तब्बू, अर्जुन कपूर, कोंकणा सेन शर्मा, नसीरूद्दीन शाह, कुमूद मिश्रा अशी तगडी स्टारकास्ट असलेला ‘कुत्ते’ हा एक थ्रीलर ड्रामा आहे. विशाल भारद्वाज यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे तर त्यांचा मुलगा आसमान भारद्वाज याने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. ‘कुत्ते’ बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी २ ते ३ कोटींच्या ओपनिंगची अपेक्षा होती. मात्र पहिल्या दिवशी या सिनेमाने केवळ १.०७ कोटी कमावले. शनिवारी या चित्रपटाने १.२० कोटींचा बिझनेस केला. तर रविवारी १.१० कोटींचा गल्ला जमवला. तीन दिवसांत या सिनेमाने एकूण ३.३९ कोटी कमावले.
‘वरिसु’ने कमावले इतके कोटी
#Varisu [#Hindi version] has a decent Weekend 1… Witnesses good jump on Sat and Sun… Fri 79 lacs, Sat 1.55 cr, Sun 1.54 cr. Total: ₹ 3.88 cr. #India biz. Excludes #South circuits. Note: HINDI version only. #VarisuHindipic.twitter.com/rSrnUbtPcm
— taran adarsh (@taran_adarsh) January 16, 2023
थलपती विजयचा ‘वरिसु’ चित्रपट ११ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. फॅमिली ड्रामा आणि ॲक्शन असलेल्या या चित्रपटात साऊथ स्टार विजय मुख्य भूमिकेत आहे. पाचच दिवसांत या चित्रपटाने भारतात १०० कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटाने काल देशभरातून एकूण २४ ते २६ कोटींची कमाई केली. तमिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये या चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळत आहे. पोंगल, मकर संक्रांत यासारख्या सणांचा या चित्रपटाला चांगलाच फायदा झाला आहे. त्यामुळे या चित्रपटाने पहिल्याच विकेंडला भारतातील कमाईचा १०० कोटींचा आकडा पार केला आहे. तर जगभरातून या चित्रपटाने आतापर्यंत १५० कोटींची कमाई केली आहे.
‘वरिसु’च्या हिंदी व्हर्जनने आत्तापर्यंत ३.८८ कोटींचा बिझनेस केला आहे. एकंदर काय तर ‘कुत्ते’ची फार काही हवा नाही. याऊलट ‘वरिसु’ ट्रेंडमध्ये आहे. त्यामुळे येत्या दिवसांत ‘वरिसु’ शर्यतीत टिकून राहील, असं जाणकारांचं मत आहे. बॉलिवूडचा पुढचा मोठा सिनेमा पठाण रिलीज व्हायला अद्याप आठवडा बाकी आहे. त्यामुळे ‘वरिसु’ला याचा फायदा मिळू शकतो.