अर्जुन कपूरची बहीण अंशुला रूग्णालयात, भेटीला पोहोचले पापा बोनी कपूर व सावत्र बहीण जान्हवी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 12:42 PM2021-06-07T12:42:51+5:302021-06-07T12:44:14+5:30
Anshula Kapoor hospitalized : निर्माता बोनी कपूर यांची लेक आणि अभिनेता अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूर सध्या रूग्णालयात आहे.
निर्माता बोनी कपूर यांची लेक आणि अभिनेता अर्जुन कपूरची (Arjun Kapoor) बहीण अंशुला कपूर ( Anshula Kapoor ) सध्या रूग्णालयात आहे. 5 जूनच्या रात्री अंशुलाला मुंबईच्या हिंदुजा रूग्णालयात दाखल करण्यात आले. तिला ब्लड प्रेशर आणि शुगर लेवलच्या समस्येमुळे रूग्णालयात भरती करण्यात आल्याचे कळते. यानंतर बोनी कपूर व सावत्र बहीण जान्हवी कपूर अंशुलाला भेटण्यासाठी रूग्णालयात पोहोचले.
जान्हवी (Janhvi Kapoor) व बोनी कपूर यांचे रूग्णालयातील फोटो समोर आल्यानंतर तर्कवितर्कांना उधाण आले होते. कारण तोपर्यंत अंशुला रूग्णालयात भरती असल्याची बातमी कन्फर्म झाली नव्हती. यापश्चात बोनी कपूरच्या कुटुंबाच्या जवळच्या सूत्रांनी अंशुला रूग्णालयात असल्याची माहिती दिली.
ई-टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अंशुलाच्या काही चाचण्या झाल्यानंतर तिला रूग्णालयातून सुट्टी देण्यात येणार आहे. अंशुला ही बोनी कपूर व त्यांची पहिली पत्नी मोना शौरी यांची मुलगी आहे. मोनी आता या जगात नाहीत.
बोनी कपूर यांनी मोना यांना घटस्फोट देत स्वत:पेक्षा 7 वर्षांनी लहान श्रीदेवीशी लग्न केले. याकाळात अर्जुन, त्याची आई आणि बहीण अंशुला या तिघांना प्रचंड संघर्ष करावा लागला. याचकाळात एकवेळ अशीही आली की, अर्जुन डिप्रेशनमध्ये गेला होता. पुढे मोना कपूर यांचे निधन झाले. यानंतर लहान असूनही अंशुलाने अर्जुनला सावरले. अंशुला बॉलिवूडच्या झगमगाटापासून दूर राहते. पण भाऊ अर्जुन कपूरसोबत ती नेहमी दिसते.
मी वडिलांचा आदर करतो पण...
अलीकडे अर्जुन कपूर वडिल बोनी कपूर व श्रीदेवी यांच्या लग्नावर बोलला होता. ‘माझ्या आईने दिलेले संस्कार नेहमी माझ्यासोबत असतील. काहीही होवो, कशीही परिस्थिती येवो पण नेहमी वडिलांसोबत राहा, असे मला आईने सांगितले होते. पापांनी जो काही निर्णय घेतला, तो प्रेमात घेतला, असे तिने मला सांगितले होते. मी आजही वडिलांचा आदर करतो. त्यांना दुस-यांदा प्रेम झाले, त्या प्रेमाचा मी आदर करतो. पण प्रेम मुळातच खूप जटील गोष्ट आहे. प्रेम एकदाच होतं, असं म्हणणं आज मूर्खपणा ठरेल,’असेही तो म्हणाला होता.