NCB च्या चौकशी दरम्यान देश सोडून गेला अर्जुन रामपाल, सिनेमाचं प्रमोशनही लटकलं....
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2020 09:23 AM2020-12-19T09:23:47+5:302020-12-19T09:25:20+5:30
एनसीबीच्या समन्सनंतर अर्जुन रामपाल एनसीबीच्या समोर उपस्थि राहू शकला नाही. तेव्हा त्याने त्याच्या वकिलाच्या माध्यमातून २२ डिसेंबरपर्यंत वेळ मागितला होता.
बॉलिवूडचे अनेक मोठे कलाकार हे सध्या एनसीबीच्या चौकशीच्या जाळ्यात आहेत. अशातच एक माहिती समोर आली आहे. अभिनेता अर्जुन रामपाल यादरम्यान देश सोडून गेल्याची माहिती समोर आली आहे. १६ डिसेंबरला एनसीबीने अर्जुन रामपालला पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याचा आदेश दिला होता. पण अर्जुन एनसीबीच्या चौकशीसाठी हजर राहिला नव्हता. अशात त्याच्याबाबत ही माहिती समोर आली आहे.
एनसीबीच्या समन्सनंतर अर्जुन रामपाल एनसीबीच्या समोर उपस्थि राहू शकला नाही. तेव्हा त्याने त्याच्या वकिलाच्या माध्यमातून २२ डिसेंबरपर्यंत वेळ मागितला होता. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याच्या आगामी 'नेल पॉलिश' सिनेमाच्या प्रमोशनची जबाबदारी असलेल्या टीमने सांगितले की, अर्जुन रामपाल सध्या परदेशात आहे. तो काही दिवसांपूर्वी काही कामानिमित्त लंडनला गेलाय.
याच कारणामुळे अर्जुन रामपालची मीडियासोबत शुक्रवारी होणारी बातचीतही कॅन्सल करण्यात आली होती. अर्जुन रामपालचा 'नेल पॉलिश' नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
एनसीबीची चौकशी मधेच सोडून देशाबाहेर जाणारा अर्जुन रामपाल हा पहिलाच कलाकार नाहीये. याआधी अभिनेत्री सपना पब्बी सुद्धा समन्स मिळाल्यावर लगेच लंडनला गेली होती. त्यानंतर तिने सोशल मीडियावरून माहिती दिली होती की, ती एनसीबीला सांगून लंडनला गेली होती.
दरम्यान, नुकतंच पुन्हा एकदा करण जोहरचं नाव चर्चेत आलं. करण जोहरला एनसीबीने समन्स पाठवला होता की, त्याच्या घरी झालेल्या पार्टीची माहिती द्यावी. यावर त्याने त्याच्या वकिलाच्या माध्यमातून एनसीबीच्या समन्सला उत्तर दिलं होतं.