मुंबई - 'मुळशी पॅटर्न'सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या प्रवीण तरडेंची नेहमीच चर्चा होते. कधी चित्रपटातील भूमिकेवरुन, कधी चित्रपटातील संवाद आणि दिग्दर्शनावरुन तर कधी तरडेंच्या चित्रपटसृष्टीतील संघर्षशाली प्रवासावरुन. आरारारारा... खतरनाक म्हणत प्रवीण तरडे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले. आपल्या हटके लूक, स्टाईलने त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. तर, वेगवेगळ्या भूमिकेतूनही ते महाराष्ट्राचं मनोरंजन करत आहेत. आता, बलूच या नवीन चित्रपटासाठी समोर आलेल्या तरडेंच्या लूकची चर्चा होत आहे.
मी शेतकऱ्यांच्या जमिनीचा प्रश्न ते गुन्हेगारी या सामाजिक विषयावरील विषय प्रेक्षकांसमोर मांडला. सिनेमाच्या विषयामुळे सुरूवातीला हा चित्रपट घेण्यासाठी कोणीही निर्माते तयार होत नव्हते. पत्नीचे दागिने मोडून, मित्रांकडून पै-पै गोळा करून मुळशी पॅटर्न प्रदर्शित केला, असा संघर्षमय प्रवास प्रवीण तरडेंनी केला आहे. त्यानंतर, नुकताच प्रदर्शित झालेल्या धर्मवीर मु.पो. ठाणे या चित्रपटालाही लोकांची मोठी पसंती मिळाली. आता, प्रवीण तरडे बलूच हा नवीन सिनेमा घेऊन येत आहेत.
मराठ्यांची आणखी एक शौर्यगाथा मांडणाऱ्या 'बलोच' चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. पानिपतच्या पराभवानंतर बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळलेले मराठे या सिनेमात पाहायला मिळतील. शिवाय त्याठिकाणी काय भयाण वास्तवाला त्यांना सामोरे जावे लागले याचे चित्रण 'बलोच'मध्ये असणार आहे. 'बलोच' या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांचे असून सिनेमाचे नवीन पोस्टर झळकले आहे. याशिवाय 'बलोच' सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर झाली आहे. येत्या ५ मे रोजी 'बलोच' चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.
दरम्यान, यापूर्वी प्रवीण तरडेंनी सरसेनापती हंबीरराव मोहिते पाटील यांच्या साहसी आयुष्यावर सिनेमा केला होता. त्यात, त्यांनी स्वत: हंबीरराव मोहिते पाटलांची भूमिका साकारली होती.