सलमान खानच्या 'वीर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या जरीन खानविरोधात कोलकात्याच्या एका न्यायालयाने फसवणूक प्रकरणात अटक वॉरंट जारी केले आहे. येथील एका इव्हेंट कंपनीने अभिनेत्रीविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. या वॉरंटनंतर जरीन खान अडचणीत आली आहे. कोर्टात हजर झाली नाही तर तिला कधीही अटक होऊ शकते.
मीडिया रिपोर्टनुसार, 2016 मध्ये कोलकाता येथे काली पूजेच्या कार्यक्रमांना ती हजर राहणार होती. पण ती उपस्थित न राहिल्याबद्दल तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. जरीनविरुद्ध कोलकाता येथील नरकेलडांगा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास अधिकाऱ्याने जरीनविरुद्धच्या खटल्याचे आरोपपत्र कोलकाता येथील सियालदह न्यायालयात सादर केले आहे.
जरीनने जामिनासाठी अर्ज केला नाही किंवा कोर्टात हजरही झाली नाही. कोर्टात हजर न राहिल्यामुळे तिच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले, असे आरोपपत्रात म्हटले आहे. तर यावर जरीन खानची प्रतिक्रिया समोर आली आहे. ती म्हणाली, 'मला खात्री आहे की यात तथ्य नाही. याचा मला देखील धक्का बसला आहे. मी माझ्या वकिलाच्या संपर्कात आहे".
जरीनने १३ वर्षांपूर्वी कलाविश्वात पदार्पण केलं. वीर या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पाय ठेवला. तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही. मात्र, तिची तुलना कतरिना कैफसोबत होऊ लागली. जरीन बऱ्यापैकी कतरिनासारखी दिसत असल्यामुळे तिला लोक कतरिनाची कार्बन कॉपी म्हणतात. जरीन कलाविश्वात फारशी सक्रीय नाही. मात्र, सोशल मीडियावर तिचा दांडगा वावर आहे.