आपल्या कॉमिक टाइमिंगसाठी ओळखला जाणारा अभिनेता अर्शद वारसी (Arshad Warsi) याने अपार संघर्षानंतर बॉलिवूडमध्ये स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं. त्याला खरी ओळख दिली ती ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’मधील सर्किट या भूमिकेने. अर्शदचे अनेक चाहते आहेत. पण तूर्तास ताजी बातमी ऐकून त्याचे चाहते चिंतेत पडले आहेत.शूटींग सुरू असतानाच अर्शदला अस्वस्थ वाटू लागलं. त्याने शूटींग लगेच थांबवत डॉक्टरांना गाठलं. मीडिया रिपोर्टनुसार, डॉक्टरांनी अर्शदला शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे. मात्र अर्शदला नेमकं काय झालं? हे अद्याप कळू शकलेलं नाही.
मीडिया रिपोर्टनुसार, अर्शदवर मुंबईतील मेडिकल सुपर स्पेशालिटीमध्ये शस्त्रक्रियेसाठी जाणार आहे. अर्शद सध्या अभिषेक डोगरा यांच्या क्राईम-कॉमेडी चित्रपट ‘जीवन भीमा योजना’ या चित्रपटाचे शूटींग करत आहे. चित्रपटाचं शूटींग सुरू असतानाच त्याने अचानक शूटींग थांबवलं व डॉक्टरांकडे पोहोचला. त्यांनतर डॉक्टरांनी त्याला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे. आज बुधवारी त्याच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याचं कळतंय.
प्रॉडक्शन क्रूच्या एका सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, अर्शदला गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ वाटतं होतं. शूटींग सुरू असतानाच त्याची प्रकृती अचानक बिघडली. अर्शद सध्या त्यांच्या घराजवळील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भरती आहे आणि आज त्याच्यावर किडनी स्टोनची शस्त्रक्रिया होऊ शकते. पुढील 15 दिवस डॉक्टरांनी त्याला पूर्ण विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे.