ऑनलाइन लोकमत
मुंबई. दि. ५ : क्रिकेटर अझरुद्दीनच्या आयुष्यावर आधारित असलेल्या ‘अझर’ या चित्रपटात प्रेक्षकांना अझरचे वैयक्तिक आयुष्य आणि क्रिकेटमधील घडामोडी पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण झाल्यानंतर काही पूर्वक्रिकेटर्स अझरच्या निर्मात्यांना कोर्टात खेचणार असल्याच्या बातम्या मीडियामध्ये येत होत्या. पण या चित्रपटाच्या बाबतीत एक वेगळीच बातमी सध्या ऐकायला मिळत आहे. चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जवळ आल्यापासून चित्रपटात पूर्वक्रिकेटरच्या भूमिकेत असणारे अभिनेते करणवीर शर्मा आणि अभिनेता मनजोत सिंग हे गायब असल्याचे म्हटले जात आहे. ते दोघेही सोशल मीडियापासून दूर आहेत.
तसेच ते कोणाच्या फोनलाही उत्तर देत नाहीत. ते काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी असलेल्या एका कार्यक्रमाला हजेरी लावणार होते. पण अचानक त्यांनी त्यांचा कार्यक्रम रद्द केला. यावर या चित्रपटाचे दिग्दर्शक टोनी डिसोझा यांचं म्हणणं आहे की, ‘‘करणवीर आणि मनजोत प्रमोशनल कार्यक्रमासाठी येणार असल्याची बातमी खरी आहे. पण ते एका कार्यक्रमात अडकले असल्यामुळे तिथे येऊ शकले नाहीत. तसेच ते दोघेही कुठल्यातरी कामात व्यग्र असतील त्यामुळे त्यांनी फोन उचलला नसेल. ते अतिशय प्रोफेशनल आहेत, ते अशाप्रकारे नक्कीच मुद्दामून वागणार नाहीत.
’’ क्रिकेट विश्वात झालेल्या मॅच फिक्सिंगच्या स्ंिटग आॅपरेशनमुळे सगळे जग हादरले होते. ‘अझर’ या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये काही पूर्वक्रिकेटरच्या नावाच्या जर्सी पाहायला मिळत आहेत. या पोस्टरनंतर अनेक प्रसिद्ध क्रिकेटर्सनी निर्मात्यांना भेटून या चित्रपटातील त्यांची व्यक्तिरेखा कशाप्रकारे दाखवली आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. पण अद्याप तरी क्रिकेट जगतातील कोणत्याही सेलिब्रेटीला हा चित्रपट दाखवण्यात आलेला नाही. या चित्रपटामुळे काही पूर्व क्रिकेटर्सची नावे अनेक वर्षांनी पुन्हा चर्चीली जातील अशी धास्ती जणू त्यांच्या मनात बसलेली आहे. तसेच या चित्रपटामुळे मॅच फिक्ंिसग प्रकरण पुन्हा लोकांमध्ये ताजे होणार आहे. या चित्रपटात अतिशय प्रसिद्ध पण तितक्याच वादात अडकलेल्या कप्तानचे आयुष्य पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर एक धमाका होणार हे नक्की आहे. हा चित्रपट पाहिल्यावरच या जाळ््यात कोण अडकलेय आणि यातून कोणाची सुटका झाली आहे हे कळेल.