मुंबई - सर्वांगाने कलाकार असलेले काही कलाकार व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून छंद जोपासतात. शिखरावर पोहोचलेल्या कलाकारांना आज कोणतीही गोष्ट विकत घेणं कठीण नाही, पण काहीजण छंद जोपासत त्यात आनंद शोधतात. दिवाळी आली की काही कलाकारांना आकाश कंदिल बनवण्याचे वेध लागतात, तर काही स्वत:च्या हाताने बनवलेल्या आकाश कंदिलाच्या आठवणीत रमतात. आकाश कंदिल बनवण्याच्या रम्य आठवणी काही कलाकारांनी शेअर केल्या...
मकरंद अनासपुरेकंदिल बनवण्याची प्रक्रिया खूप मजेदार आणि आनंददायी असते. मुलांसोबत एन्जॅाय करता येतं. मुलांना कंदिल बनवताना शिकताना आपणही नवनवीन गोष्टी शिकत जातो. मी आजही कंदिल बनवतो. जिलेटीन पेपर, बांबूच्या काड्या आणि गम इतकं साहित्य कंदिलसाठी पुरेसं असतं. अलिकडे नवनवीन आणि आकर्षक साहित्य उपलब्ध होत असल्यानं कंदिल जास्त सुंदर बनत आहे. इतर गोष्टींसोबत कंदिल बनवणंही तसं महाग झालंय, पण विकतच्या कंदिलापेक्षा बनवलेला कंदिल आत्मिक समाधान देतो.
जयवंत वाडकरपूर्वी चीराबाझारमध्ये रहताना टाकाऊपासून टिकाऊचा मंत्र आत्मसात करून थेट स्मशानातील बांबू आणून त्यापासून कंदिल बनवायचो. बांबू स्वच्छ धुवून, कापून काड्या बनवून घरीच गव्हाची पेस्ट बनवायचो. घरातील कंदिलासोबत चाळीचाही मोठा कंदिल बनवायचो. केवळ रंगीबेरंगी कागद विकत आणायचो. त्यामुळे मोठ्या कंदिलाला ३५-४० रुपये खर्च आणि लहान कंदिल पाच रुपये खर्च यायचा. आज प्रदीप पटवर्धनची आठवण येतेय. तो देखील कंदिल बनवायचा. दिवाळीत पूर्वी दोन गटांमध्ये एकमेकांच्या अंगावर जळते फटाके टाकण्याचा भयानक प्रकार होता. तो आम्ही नंतर बंद केला.
आनंदा कारेकरबालपणापासून गिरगावातील ठाकूरद्वारमध्ये रहात असल्यानं तिथली परंपरा रक्तात भिनली आहे. तिसरी-चौथीत असल्यापासून कंदिल बनवतो. गिरगावात कंदिल बनवण्याची स्पर्धा व्हायची. त्यात मला प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालं होतं. मी आजही कंदिल बनवतो. शूटमध्ये असतो तेव्हा कधी उशीरही होतो. लोकांचे कंदिल चार दिवस आधी लागतात, पण आजही माझा दिवाळीच्या पहाटे लागतो. सलग पाच तास बसून कंदिल पूर्ण करतो. आज कंदिल बनवायला ८०-१०० रुपये खर्च येतो. यात पैसे वाचवण्याऐवजी स्वत: कंदिल बनवण्याचा वेगळा आनंद मिळतो.
पॅडी कांबळेआता कंदिल बनवणं शक्य होत नाही, पण बालपणी जे दिवे लावले त्यांचा उजेड पडत आहे. माझं बालपण करी रोड-डिलाईल रोड भागात गेलं. छत्रपती शाहू सदनमध्ये रहायचो. तिथे असताना कंदिल बनवायचो. बांबूच्या काड्या, रंगीबेरंगी कागद आणून पेस्ट घरीच बनवायचो. बऱ्याचदा कंदिल बनवताना फाटायचा, कित्येकदा कंदिल छान झाल्यावर लावताना फाटायचा, कित्येकदा खळ प्रवृत्तीचे मित्र खट्याळपणे दगड मारून कंदिल फाडायचे. अशा कंदिलाच्या गोड आठवणी आहेत. आता कंदिल बनवणं शक्य होत नसलं तरी मुलगी आद्याला शाळेत अॅक्टिव्हीटी असल्यावर तिला मदत करतो.
विजय कदमगिरणगावातील डिलाईल रोडला प्रकाश टॅाकिजच्या शेजारी रहायचो तेव्हा मजल्यावरील सर्वांचे एक सारखे कंदिल व्हावेत यासाठी कंदिल बनवायचो. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये दुपारचा वेळ कंदिल बनवण्यासाठी सत्कारणी लावायचो. कुणी काठ्या तासायचं, कुणी खळ तयार करायचं, कुणी कागद कापायचं... घरी पैसे मागितल्यावर कंदिलाच्याच काठ्यांनी मारतील अशी भीती होती. त्यामुळे कंदिलसाठी साहित्य आमचं आम्हीच जमवायचो. फटाक्यांची आठवण सांगायची तर एकदा कुणीतरी नुकताच फुलबाजा पेटवून टाकला होता आणि त्यावर माझा पाय पडला होता. अगोदर मार खाल्ला आणि नंतर केईएममध्ये ट्रिटमेंट झाली होती. तेव्हापासून फुलबाजाच्या काडीवर कोणाचा पाय पडणार नाही याची काळजी घेतो.
सोनाली कुलकर्णी सोकुल सोनाली कुलकर्णी म्हणाली की, मी कधी आकाश कंदिल बनवला नाही, पण माझं बालपण पुण्यात गेल्यामुळे दरवर्षी मी आणि माझा भाऊ संदेश दोघे मिळून किल्ला बनवायचो. किल्ल्यात काही ना काही धान्य पेरावं लागतं. नवअंकुरांनी किल्ल्याचं सौंदर्य खुलून दिसतं. एक वर्षी किल्ला अप्रतिम बनला, पण धान्य उशीरा पेरल्यानं ते उगवलंच नाही. दिवाळीनंतर आठ-दहा दिवसांनी कोंब आले आणि तोपर्यंत आम्हाला किल्ला जपत बसावं लागलं.