Join us

उत्कृष्ट भूमिकेलाच प्राधान्य देते-अरुणा इराणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 12:26 PM

चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अरुणा इराणी यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने असंख्य प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.

-रवींद्र मोरे १९६१ मध्ये ‘गंगा जमुना’ या चित्रपटातून बाल कलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अरुणा इराणी यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने असंख्य प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. त्या सध्या ‘दिल तो हॅपी है जी’ या मालिकेत दिसत असून या मालिकेतील त्यांच्या भूमिकेबाबत आणि आतापर्यंतच्या प्रवासाबाबत त्यांच्याशी मारलेल्या मनसोक्त गप्पा...!

* या मालिकेतील भूमिकेविषयी काय सांगणार?- या मालिकेत पहिल्यांदाच पंजाबी टाइपची हिंदी बोलत आहे, म्हणून मला काही वर्कशॉप करावे लागले. लूकच्या बाबतीत बोलायचे झाले तर पंजाबी महिला ज्या प्रकारे वेशभूषा परिधान करतात त्याच प्रकारे माझाही पोशाख आहे. ही अत्यंत महत्त्वाची भूमिका असून याबाबत मी खरंच खूप आनंदी आहे. 

* या भूमिकेसाठी आपणास काय विशेष तयारी करावी लागली?- सर्वप्रथम मला भाषेची तयारी करावी लागली. कारण मी हिंदीच बोलते आणि या भूमिकेसाठी मला पंजाबी भाषेची तयारी करावी लागली. शिवाय भूमिकेला न्याय मिळावा म्हणून लूकचीही तशी उत्कृष्ट तयारी करावी लागली, यासाठी सर्व टीमने खास मेहनतही घेतली. 

* गेल्या काही वर्षात आपण चित्रपटात दिसले नाहीत, याचे काही खास कारण?- तसे खास काही कारण नाही, मध्यंतरी एक ते दिड वर्ष मी चित्रपटात दिसली नव्हती, कारण सर्व सेट नायगावमध्ये लागत होते, त्यामुळे येण्या-जाण्यासाठी खूपच वेळ लागत होता. त्यामुळे मी चित्रपटात दिसू शकली नाही. 

* आपण दीर्घकाळापासून या इंडस्ट्रीत आहात, तर सुरुवातीचा काळ आणि आताचा काळ यात आपणास फरक जाणवतोय?- टीव्हीच्या मेकिंगमध्ये खूपच बदल झालेला दिसतोय. सर्व काही हायफाय झालेले दिसते. टीव्ही मालिकांचेही सेट चित्रपटांच्या सेटसारखेच उभारले जाऊ लागले आहेत. अद्ययावत तंत्रसामुग्रीचा वापर होताना दिसतोय.

* भविष्यात आता जर चित्रपटांची संधी मिळाली तर कोणत्याप्रकारचे चित्रपट करु इच्छिता?- मला कोणत्याही चित्रपटात कोणतीही भूमिका करायला आवडत नाही. चांगली भूमिका असेल तरच मी निवड करते.  चित्रपटाच्या कथेबरोबर भूमिकाही उत्कृष्ट असेल तरच मी तो चित्रपट साइन करते. यापुढेही मी हीच दक्षता घेणार आहे. 

* या इंडस्ट्रीकडून आपल्या काय अपेक्षा आहेत?- या इंडस्ट्रीने मला बरेच काही दिले आहे, त्यामुळे मी काहीच अपेक्षा करत नाही. कारण आमच्या सारख्या कलाकारांना पोट भरण्याचं साधन दिले आहे, यापेक्षा अजून दुसरं काय पाहिजे. या इंडस्ट्रीने आम्हाला जे काही दिले आहे, ते कुठेच मिळू शकणार नाही.    

टॅग्स :अरुणा इराणीटेलिव्हिजन