Join us

Aruna Irani : “रेखाने मला सिनेमातून बाहेर काढलं...”, ४२ वर्षांनंतर अरूणा इराणींचा शॉकिंग खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2023 3:17 PM

Aruna Irani : रेखाबद्दल काय म्हणाल्या अरूणा इराणी? काय आहे भानगड?

आपल्या हरहुन्नरी अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान पटकावणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे अरुणा इराणी (Aruna Irani ). नायिका, खलनायिका, चरित्र अभिनेत्री अशा विभिन्न भूमिकांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. वाट्याला आलेल्या प्रत्येक भूमिकेचं सोनं केलं.  बाँबे टू गोवा, उपकार, राजा बाबू, लाडला, लावारीस या सिनेमात त्या झळकल्या. मै लक्ष्मी तेरे आंगन की, झाँसी की रानी, देखा एक ख्वाब या मालिकांमध्येही त्यांनी काम केलं. याच अरूणा इराणींनं इतक्या वर्षांनंतर एक मोठा खुलासा केला आहे.

होय,  नुकतंच त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेच्या पॉडकॉस्टला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अभिनेत्री रेखा (Rekha) यांच्याबद्दल एक शॉकिंग खुलासा केला.  रेखा यांच्यामुळे तुम्हाला ‘मंगळसूत्र’ या चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता, हे खरं आहे का? असा प्रश्न यावेळी त्यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला त्यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं. 

काय म्हणाल्या अरूणा?“रेखा ही माझी खूप चांगली मैत्रीण होती. मी काही वर्षांपूर्वी ‘मंगळसूत्र’ नावाचा सिनेमा करत होते. यात मी हिरोच्या पहिल्या पत्नीच्या भूमिकेत होते. जिचा मृत्यू होतो आणि नंतर ती भूत बनते. याच चित्रपटात रेखा दुसऱ्या पत्नीच्या भूमिकेत होती. एक दिवशी अचानक मला निरोप मिळाला. तुला या सिनेमातून काढून टाकण्यात आलं आहे, असं मला सांगण्यात आलं. मला कळेना. मी तडक निर्मात्याकडे गेले आणि असं अचानक काढून टाकण्यामागचं कारण विचारलं. तुम्हाला माझ्याकडून काही समस्या आहे का, काही अडचण आहे का असा प्रश्न मी त्यांना केला. अखेर निर्मात्यांना खरं कारण सांगावं लागलं. रेखा यांना तुमच्यासोबत काम करायचं नाहीये, त्यामुळे नाईलाजास्तव आम्हाला हा निर्णय घ्यावा लागल्याचं ते म्हणाले. यानंतर मी रेखाला जाब विचारायचं ठरवलं.

मी गेले आणि तिला थेट विचारलं. मी तुला या चित्रपटात काम करायला नको आहे, हे खरं आहे का? असा थेट प्रश्न मी केला. ती उद्धटपणे ‘हो’ म्हणाली. अर्थातच मी कारण विचारलं.  त्यावर ती म्हणाली, बघ अरुणा, या चित्रपटात माझा अभिनय जरा वर-खाली झाला असता तर मला लोकांनी खलनायक ठरवलं असतं. त्यामुळेच ती भूमिका तू करावी अशी माझी इच्छा नाही. यावर मी काय बोलणार होते. हे निर्मात्यांना सांगण्याआधी मला फोन करून वा प्रत्यक्ष सांगितलं असतंच तर बरं झालं असतंस. तू चुकलीस, इतकंच मी म्हणाले. तिने माझी माफी मागितली. मला माफ कर, पण माझ्या करिअरचा प्रश्न आहे, म्हणून मी असं वागले. मी अजून  काय करू शकते, असं ती मला म्हणाली.  

टॅग्स :अरुणा इराणीरेखाबॉलिवूड