ड्रग्ज प्रकरणी गेल्या २५ दिवसांपासून एनसीबीच्या (NCB) कोठडीत असलेल्या आर्यन खानला (Aryan Khan) आज अखेर जामीन मिळाला आहे. त्याच्यासोबत ड्रग्ज बाळगणाऱ्या मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांनाही उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. गेल्या तीन दिवसांपासून उच्च न्यायालयात आर्यनच्या जामिनावर युक्तिवाद सुरू होता. अखेर त्याला जामीन मिळाला आहे. आर्यनचा जामीन मंजूर झाल्यानंतर कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच माध्यमातून शाहरुखचं (Shah Rukh Khan) अभिनंदन केलं आहे. यामध्येच दक्षिणात्य सुपरस्टार आर. माधवन (R Madhavan) याने केलेलं ट्विट अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. एक पिता म्हणून मी समाधानी असल्याचं त्याने या ट्विटमध्ये म्हटलं आहे. (Aryan Khan Bail)
काय आहे आर. माधवनचं ट्विट?
"देवाचे आभार, एक पिता म्हणून मी खूप समाधानी आहे. यापुढे सगळ्या चांगल्या आणि सकारात्मक गोष्टीच घडू देत", असं ट्विट माधवनने केलं आहे.
अखेर जामिनावर झाली आर्यनची सुटका
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील महत्त्वपूर्ण सुनावणी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुरू झाली होती. मात्र, ही सुनावणी अपूर्ण राहिल्यामुळे आर्यन आणि मुनमुन धमेचा, अरबाज मर्चंट यांच्या जामीन अर्जावरील उर्वरित सुनावणी काल (ऑक्टोबर) पार पडली. आर्यनतर्फे युक्तिवाद मंगळवारी पूर्ण झाला होता. तर काल अरबाज मर्चंट आणि मुनमून धमेचातर्फेचा युक्तिवाद पूर्ण झाला. मात्र एनसीबीचा युतीवाद राहिल्यामुळे न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी आज (२८ ऑक्टोबर) सुनावणी ठेवली. एनसीबीच्यावतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांच्यासह श्रीराम शिरसाट आणि विशेष सरकारी वकील अद्वैत सेठना यांनी जोरदार युक्तिवाद केला. मात्र, आर्यन खानसह अरबाज आणि मुनमुन यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. उद्या उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळाल्यानंतर आर्यन आणि अन्य दोघा जणांची तुरुंगातून बाहेर येण्याची प्रक्रिया सुरु होईल.