हिंदी सिनेमातील सदाबहार अभिनेते देव आनंद (Dev Anand) यांची आज जन्मशताब्दी. त्यांना 'रोमान्सचा बादशाह' असंही म्हटलं जायचं. त्या काळी त्यांची एक झलक पाहण्यासाठी रस्त्यावर तुफान गर्दी व्हायची. त्यांना काळ्या कोटमध्ये पाहून तरुणी जीव ओवाळून टाकायच्या. या दिग्गज अभिनेत्याबद्दल आपण अनेक किस्से ऐकलेच आहेत. त्यातलीच एक आठवण म्हणजे देव आनंद यांचा सिनेमा रिलीज होताच मुंबई शहरातील सगळ्या टॅक्सी गायब झाल्या होत्या.
का आहे तो किस्सा?
1954 साली देव आनंद यांचा 'टॅक्सी ड्रायव्हर' हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमाला प्रेक्षकांची खूपस पसंती मिळाली. चाहत्यांमध्ये या सिनेमाची इतकी क्रेझ होती की एका संध्याकाळी मुंबईतील सर्व टॅक्सीच गायब झाल्या होत्या. त्याचं झालं असं की टॅक्सी ड्रायव्हर असोसिएशनचे अध्यक्ष सर्व टॅक्सी ड्रायव्हर्ससोबत हा सिनेमा बघायला थिएटरमध्ये गेले होते.
या सिनेमात देव आनंद यांच्याशिवाय कल्पना कार्तिक, शीला रमानी मुख्य भूमिकेत होते. अतिशय कमी बजेट आणि कमी युनिटमध्ये हा सिनेमा तयार झाला होता. तरी सिनेमाने तगडी कमाई केली होती.
लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
३ डिसेंबर २०११ रोजी देव आनंद यांचं लंडनमध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर २ महिन्यांनी चार्जशीट हा सिनेमा रिलीज झाला जो त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला. हा सिनेमा त्यांनी स्वत: दिग्दर्शित आणि निर्मित केला होता.