मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. अनेक मुद्यांवर ती अगदी परखडपणे मत मांडताना दिसते. यामुळे अनेकदा वादही ओढवून घेतले. मागील वर्षी केतकी चितळेचा एक एपिसोड चांगलाच गाजला होता. एका वादग्रस्त फेसबुक पोस्टमुळे केतकीला तुरुंगाची हवा खावी लागली होती. आता पुन्हा एकदा केतकी चर्चेत आहे. तिची एक पोस्ट सध्या व्हायरल होतेय. मी एकतर सत्य बोलण्याने मरेन किंवा नैसर्गिकरित्या गप्प राहिल्याने माझा मृत्यू होईल..., अशा आशयाच्या तिच्या पोस्टची जोरदार चर्चा आहे.
केतकीने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, सोबत पोस्ट. “मी अजूनही न्यायासाठी लढतेय, पण सत्य बोलतेय. जामिनावर सुटका झालेली मी एकमेव नाही, तुम्ही माझ्यावर नवीन गुन्हे दाखल केलेत, माझ्याबद्दल खोट्या बातम्या पसरवल्या तरीही मी सत्य बोलत राहीन. मी एकतर सत्य बोलण्याने मरेन किंवा नैसर्गिकरित्या गप्प राहिल्याने माझा मृत्यू होईल,” असं केतकीने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
या पोस्टला दिलेल्या कॅप्शनमध्येही तिने सत्य बोलण्याबद्दल लिहिलं आहे. ती म्हणते, लोक सत्य ऐकायला आणि बोलायला घाबरतात. कारण सत्य हे नेहमीच धोकादायक असतं. सत्य लपवण्यासाठी एखाद्याचा जीवही घ्यायलाही ते मागेपुढे पाहत नाही.
पुढे तिने एक नोट शेअर केलीये. यात ती म्हणते, एखाद्या अपघातात किंवा संशयास्पदरित्या माझा मृत्यू झाला किंवा माझ्या निधनाचं कारण प्रमाणाबाहेर औषधं अथवा गळफास असेल तर माझा मृत्यू अपघात किंवा आत्महत्या नसेल. मी suicide survivorआहे. त्यामुळे मी पुन्हा आत्महत्या करणार नाहीच. त्यामुळे यावेळी आत्महत्या केल्याने माझा मृत्यू होणार नाही. माझ्या मृत्यूची बातमी आली तर यामागील सत्य तुम्हाला ठाऊक असेल. जय हिंद! वंदे मातरम्! भारत माता की जय!