Asha Bhosle: आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस (Eknath Shinde Birthday) आहे. एकनाथ शिंदे यांच्या आज (९ फेब्रुवारी) ६१ वा वाढदिवस असल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शिंदेंना वाढदिवसानिमित्त भारतीय गायनविश्वातील प्रख्यात गायिका म्हणजे आशा भोसले यांनी खास शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच आशा भोसले यांनी एकनाथ शिंदे यांचे तोंडभरुन कौतुक केलंय.
आशा भोसले यांनी शनिवारी एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती, या त्यांनी कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो पचास हजार..हे गाणे गात आशा भोसले यांनी एकनाथ शिंदेंना शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या, "मी तुमच्यासाठी गातेय...तुमचा वाढदिवस आहे. तुम्ही मला फार आवडता. तुम्ही अचानक वरती आलात, आम्हाला माहित नव्हतं तुम्ही काम करत होतात. तुम्ही अचानक वर आलात आणि जशी बाळासाहेबांनी एकट्याने शिवसेना घडवली, तशी तुम्ही पुन्हा एकट्याने शिवसेना घडवली".
"मला तुमचा अभिमान आहे. कारण, त्यावेळेला सगळं काही निवळलं होतं, त्यावेळी तुम्ही आलात. ज्या हिंमतीने तुम्ही आलात, लोकांच्या बोलण्याला तुम्ही तोंड दिलं, सगळे तुमच्यावर धावून आले होते, त्यावेळी तुम्ही परिस्थितीला तोंड दिलं आणि यशस्वी झालात आणि आणखी यशस्वी व्हाल, असा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. शतायुषी व्हा आणि असंच कार्य करत राहा. चांगलं कार्य केल्याने कुणीही कधीही संपत नाही", असे म्हणत आशा भोसले यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना एकनाथ शिंदेंना मोलाचा सल्ला दिला आहे.
यावर आशा भोसले यांचा व्हिडीओ पोस्ट करत एकनाथ शिंदे यांनी त्यांचे आभार मानलेत. ट्विटवर X वर त्यांनी लिहलं, "आदरणीय आशा ताई, आपण माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिलेल्या शुभेच्छांचा मी आदरपूर्वक स्वीकार करतो. आपल्या सारख्या महान व्यक्तीमत्वांनी दिलेले शुभाशीर्वाद मला सर्वसामान्यांची सेवा करण्यासाठी कायम ऊर्जा आणि प्रेरणा देतील. मनःपूर्वक आभार....", या शब्दात त्यांनी आभार मानले. दरम्यान, शिंदेंना वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्याची माहिती आहे.