Join us

क्या बात!! 'अशी ही बनवाबनवी'मधील एव्हरग्रीन गाणं नव्या रूपात; 'टकाटक 2'च्या निर्मात्यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2022 4:42 PM

Hridayi Vasant Phulatana: 'टकाटक 2'  (Takatak 2) या आगामी चित्रपटात हे गाणं रिक्रिएट केलं जाणार आहे. नुकतीच या चित्रपटाच्या निर्मात्यांनी याविषयीची घोषणा केली आहे.

मराठी कलाविश्वाच्या इतिहासात 'अशी ही बनवाबनवी' (Ashi Hi Banavabanavi ) या चित्रपटाचं नाव सुवर्णाक्षराने कोरलं गेलं आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज कित्येक वर्ष झाले मात्र, त्याची लोकप्रियता यत्किंचितही कमी झालेली नाही. या चित्रपटातील संवाद, विनोदी किस्से आणि त्यातील सदाबहार गाणी आजही रसिकप्रेक्षक तितक्याच आवडीने पाहतात. विशेष म्हणजे या चित्रपटातील सुपरहिट ठरलेलं 'हृदयी वसंत फुलताना' (Hridayi Vasant Phulatana) हे गाणं पुन्हा एकदा नव्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येणार आहे.  'टकाटक 2'  (Takatak 2) या आगामी चित्रपटात हे गाणं रिक्रिएट केलं जाणार आहे. नुकतीच या चित्रपटाच्या निर्मात्यांनी याविषयीची घोषणा केली आहे.

येत्या १८ ऑगस्ट रोजी 'टकाटक 2'  हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या पोस्टर, ट्रेलर आणि टीझरने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे यामध्येच आता 'अशी ही बनवाबनवी' चित्रपटातील गाणं नव्या अंदाजात सादर होणार असल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

'टकाटक 2' मध्ये नव्याने सादर होणाऱ्या 'हृदयी वसंत फुलताना...' या गाण्यात नेमके कोणते कलाकार झळकणार, या गाण्याचं संगीत कोण देणार, हे गाणं कोणते गायक सादर करणार असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत. मात्र, या सगळ्याची उत्तरं चित्रपटाच्या टीमने गुलदस्त्यात ठेवली आहेत. तसचं हे गाणं 'टकाटक २'मध्ये प्रमोशनल साँग म्हणून समाविष्ट करण्यात येणार आहे. 

पर्पल बुल एंटरटेनमेंटने पॅरिस-मुख्यालय असलेल्या Believe (बीलिव्ह) डिजिटल म्युझिक कंपनीकडून 'हृदयी वसंत फुलताना...' या गाण्याचं रुपांतरण करण्याचे अधिकार मिळवले आहेत.  हे गाणे इश्तार म्युझिकच्या यू ट्यूब चॅनल आणि सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर ६ ऑगस्टपासून संगीतरसिकांसाठी उपलब्ध होणार आहे. 

हे कलाकार झळकणार महत्त्वपूर्ण भूमिकेत

या चित्रपटामध्ये प्रथमेश परब, अजिंक्य राऊत, अक्षय केळकर, प्रणाली भालेराव, भूमिका कदम, कोमल बोडखे, सुशांत दिवेकर, स्वप्नील राजशेखर, किरण माने, पंकज विष्णू, किरण बेरड, आरजे महेश काळे, स्मिता डोंगरे आदी कलाकार झळकणार आहेत.

 दरम्यान, दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनीच 'टकाटक २'ची कथा-पटकथा लिहिली आहे. तर लेखक किरण बेरड आणि संजय नवगिरे यांनी संवादलेखनाचं काम केलं आहे. निलेश गुंडाळे यांनी या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.  

टॅग्स :टकाटकअशी ही बनवाबनवीसिनेमाप्रथमेश परबसेलिब्रिटीसंगीत