'अशी ही बनवा बनवी' चित्रपटातील प्रत्येक पात्र आजही प्रेक्षकांना चांगलेच लक्षात आहे. या सिनेमात शंतनू माने म्हणजेच अशोक सराफ यांचा भाऊ धनंजची भूमिका साकारली होती सिद्धार्थ रे(Siddharth Ray)ने. त्याने १९९९ मध्ये बॉलिवूड अभिनेत्री शांतीप्रिया (Shanthipriya) हिच्यासोबत लग्न केले. शांतिप्रिया हिने अनेक तमीळ आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. अक्षय कुमारचा सौगंध या पहिल्याच चित्रपटात शांतीप्रिया अभिनेत्री होती. लग्नाला जेमतेम ५ वर्ष झाली आणि अचानक ८ मार्च २००४ रोजी वयाच्या अवघ्या ४१ व्या वर्षी सिद्धार्थचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना दोन मुले देखील आहेत. मुलाचे नाव शुभम आणि मुलीचे नाव शिष्या आहे. अभिनेत्याच्या मृत्यूनंतर शांतिप्रियाने इंडस्ट्रीला रामराम केला होता. मात्र आता मोठ्या कालावधीनंतर तिने अभिनयाच्या सेकंड इनिंगला सुरुवात केलीय. मात्र आता तिला इंडस्ट्रीत घेतलेल्या ब्रेकचा पश्चाताप होत असल्याचं म्हटलंय.
अभिनेत्री शांतीप्रियाने वयाच्या १९ व्या वर्षी तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. बॉलिवूड व्यतिरिक्त तिने तमीळ, तेलुगू आणि कन्नड भाषेतील चित्रपटांमध्येही काम केले. मात्र लग्नानंतर ती अभिनयापासून दूर गेली. मात्र, २००८ मध्ये ती टीव्हीच्या दुनियेत परतली आणि काही शो केले.
'कमबॅक करणं खूप अवघड'
शांती प्रिया म्हणाली, 'इंडस्ट्री सोडू नका, कमबॅक करणं खूप अवघड आहे. मला अजूनही वाटतं की मी बॉलिवूड सोडायला नको होतं, कारण मला माझ्या कामाची किंमत नाही असं वाटत होतं. आता मी माझ्या पुनरागमनावर लक्ष केंद्रित करत आहे, आता मी जे काही करत आहे, ते मी नवोदित असताना केले नाही. त्यामुळे इंडस्ट्री सोडू नका असा माझा लग्न करणाऱ्या सर्व नवोदितांना हा सल्ला आहे. पण इंडस्ट्री सोडायची असेल तर दोनदा विचार करा.
२०२२ मध्ये केलं कमबॅकशांतीप्रियाचा नवरा सिद्धार्थ रेचे २००४ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पतीच्या निधनानंतर, शांतीप्रियाने २०२२ मध्ये 'धारावी बँक' या सीरिजद्वारे बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले आणि काही टीव्ही शो देखील केले. 'धारावी बँक'मधील तिच्या कामाचे खूप कौतुक झाले.