चित्रपट व मालिकांमध्ये विविध भूमिका सक्षमपणे साकारून रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केल्यानंतर अभिनेता आशिष चौधरीने दीपा परदसानी यांच्यासोबत चित्रपट निर्मिती संस्था स्थापन केली आहे. हिंदुस्तान टॉकीज असे या प्रोडक्शन हाऊसचे नाव असून देशातील वेगवेगळ्या भाषेत आशयघन चित्रपटांची निर्मिती करण्याचा त्यांचा मानस आहे.
हिंदुस्तान टॉकीजने अभिनेता रितेश देशमुख अभिनीत आणि जियो स्टुडियोज तसेच मुंबई फिल्म कंपनीसह माऊली चित्रपटाची सहनिर्मिती करून प्रादेशिक सिनेमाच्या निर्मितीला सुरूवात केली आहे. निर्माते म्हणून हिंदुस्तान टॉकीजसाठी आशिष आणि दीपा व्यावसायिक आशयघन सिनेमा तयार करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. याबाबत आशीष चौधरी म्हणाला, हिंदुस्तान टॉकीजमध्ये, आम्ही चांगल्या स्क्रिप्टमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करीत आहोत. दीपा आणि मी दोघांनाही दर्जेदार प्रोजेक्ट बनवण्याची इच्छा आहे. म्हणूनच, जेव्हा रितेश आणि जिओबरोबर सहकार्य करण्याची संधी आली तेव्हा आम्हाला ती योग्य संधी वाटली. तसेच, मुंबई फिल्म कंपनी आणि जियो स्टुडिओसारख्या मार्केटलीडर सोबत काम करणे आनंददायी बाब आहे. तर दीपा परदसानीने सांगितले की, आम्ही नवीन लेखकांना सोबत काम करण्यास तयार आहोत. आम्हाला वाटते की त्यांच्याकडे एक सशक्त आशय आहे. तसेच, ऑनलाइन प्लॅटफार्म सुरू करणार आहोत. विविध माध्यमांचा वापर करून सर्व प्रदेशात पोहचण्याचा आमचा ध्येय आहे. मराठी चित्रपट माऊली चित्रपटानंतर, हिंदुस्तान टॉकीज सुरुवातीच्या काळात पंजाबी आणि बंगालीसह आणि पुढे पुढे प्रादेशिक भाषांतील सिनेमाची निर्मिती करणार आहेत. तसेच वेबसीरिजची देखील निर्मिती करणार आहे.