आशिष विद्यार्थी यांनी हिंदी, तामीळ, कन्नड, मल्याळम, तेलगू, बंगाली, इंग्रजी, ओडिसा आणि मराठी भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते केवळ एक चांगले अभिनेते नव्हे तर खूपच चांगले स्पीकर देखील आहेत. त्यांनी चित्रपटांप्रमाणे मालिकांमध्ये देखील काम केले आहे. त्यांना द्रोहकाल या त्यांच्या चित्रपटातील अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात देखील आलेले आहे.
आशिष विद्यार्थी यांचा जन्म हा केरळमधील असून त्यांच्या आई या प्रसिद्ध कथ्थक नर्तिका होत्या. त्यांनी कॉलेज जीवनात असताना रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली. तसेच नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये अभिनयाचे धडे गिरवले. त्यांनी सरदार या चित्रपटाद्वारे त्यांच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी सरदार या चित्रपटाचे चित्रीकरण आधी केले असले तरी त्यांचा द्रोहकाल हा चित्रपट पहिल्यांदा प्रदर्शित झाला.
या चित्रपटातील त्यांची भूमिका चांगलीच गाजली. या चित्रपटानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्या असून प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद त्यांच्या भूमिकांना मिळालेला आहे. इस रात की सुबह नही, १९४२ अ लव्ह स्टोरी, जीत, जिद्दी या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांचे चांगलेच कौतुक झाले आहे.
आशिष विद्यार्थी यांनी काम केलेल्या चित्रपटांपैकी सुमारे १८२ चित्रपटांमध्ये त्यांचे निधन झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, एकदा ते मृत्यूच्या दाढेतून परत आले होते. ऑक्टोबर २०१४ ला बॉलिवूड डायरी या चित्रपटाचे चित्रीकरण छत्तीसगड येथे सुरू होते. या चित्रीकरणाच्यावेळी आशिष विद्यार्थी आणि त्यांचे काही सहकलाकार पाण्यात बुडता बुडता वाचले होते. त्यांना विकास सिंह या पोलिस अधिकाऱ्याने वाचवले होते. या चित्रपटातील दृश्यानुसार त्यांना पाण्यात उतरायचे होते. पण पाण्यात उतरल्यावर ते बूडू लागले. सुरुवातीला सगळ्यांना हा एक चित्रीकरणाचा भाग आहे असे वाटले. पण आशिष विद्यार्थी बुडत आहेत हे विकास सिंग यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांना वाचवले होते.