अग्गंबाई सासूबाई ही मालिका नुकतीच झी मराठी या वाहिनीवर सुरू झाली असून या मालिकेला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे. या मालिकेची कथा, या मालिकेतील सगळ्याच कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना भावत आहे. या मालिकेत तेजश्री प्रधान सोबतच निवेदिता सराफ, रवी पटवर्धन आणि गिरीश ओक हे प्रमुख भूमिका साकारताना दिसत आहेत. तसेच या मालिकेत आशुतोष पत्की देखील मुख्य भूमिकेत आहे. आशुतोष हा मराठीतील एका दिग्गज व्यक्तीचा मुलगा असून त्याने याआधी देखील काही मालिकांमध्ये काम केले आहे. त्याचा पहिला मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा आशुतोष हा मुलगा असून अग्गंबाई सासूबाईच्या आधी त्याने काही मालिकांमध्ये काम केले होते. त्याचसोबत त्याचा वन्स मोअर हा पहिला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अभिनय हे आशुतोषचं पॅशन आहे. त्यामुळेच बारावीनंतर हॅाटेल मॅनेजमेंट पूर्ण करून तो थेट अभिनयाकडे वळला. अनुपम खेर यांच्या अॅकॅडमीमध्ये त्याने अभिनयाचे धडे गिरवले आहेत. ‘मेंदीच्या पानावर’ आणि ‘दुर्वा’ या गाजलेल्या मालिकांच्या माध्यमातून आशुतोष घराघरात पोहोचला. त्याला या मालिकांमुळे चांगली लोकप्रियता देखील मिळाली.
वडील जरी संगीतकार असले तरी अभिनयाकडे वळण्याबाबत आशुतोषने लोकमतशी बोलताना सांगितले होते की , गाणं आणि संगीत हे लहानपणापासून माझ्या आयुष्याचा एक भाग बनले आहे. पण अभिनय हे माझं पॅशन आहे. बाबांनीही कधीच कोणत्याही गोष्टीसाठी मला फोर्स केला नाही की कोणतीही गोष्ट करायला अडवले नाही. त्यामुळे हॅाटेल मॅनेजमेंटनंतर अभिनयाचं ट्रेनिंग घेऊन मी मालिकांमध्ये काम केले.
अशोक पत्की यांनी आजवर अनेक गीतांना संगीत दिले आहे. त्यांनी संगीत दिलेली अनेक मालिकांची शीर्षक गीतं तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली आहेत. वादळवाट, गोट्या, आभाळमाया, अस्मिता, गोट्या यांसारख्या अनेक मालिकांची शीर्षक गीतं आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. अग्गंबाई सासूबाई या मालिकेच्या शीर्षक गीताला देखील अशोक पत्की यांनीच संगीत दिले आहे.