मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी चित्रपटांचा काळ गाजवणारे अशोक सराफ (Ashok Saraf) हे एक मराठी सुपरस्टार आहेत. अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक असे नाव आहे जे आजही आदराने घेतले जाते. अनेक तरुण कलाकारांचे ते आदर्श आहेत. विनोदाचा बादशहा ते खलनायक आणि गंभीर भूमिकाही अशोक सराफ यांनी तितक्याच ताकतीने मनोरंजनाच्या पडद्यावर रंगवल्या आहे. अशोक सराफ यांनी नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही माध्यमात काम केले आहे. त्यांच्या या कारकीर्दीत त्यांना असंख्य चांगले-वाईट अनुभव आले आहेत. हे अनुभव त्यांनी त्यांच्या 'बहुरूपी' या पुस्तकात लिहिले आहेत. त्यातील एक अनुभव हा त्यांचा मुलगा अनिकेतच्या बालपणीचा आहे. जेव्हा खिशात पैसे असूनही ते मुलासाठी दूधही घेऊ शकले नव्हते.
निवेदिता आणि अशोक सराफ यांना अनिकेत हा एकुलता एक मुलगा आहे. अनिकेत खूप लहान होता. त्यावेळचा एक किस्सा अशोक सराफ यांच्यासाठी एक शिकवण देणारा ठरला होता. एकदा कोल्हापूर येथे अंबाबाईच्या दर्शनाला ते गेले होते. तिथून पुन्हा ते मुंबईला ट्रेनने आले. त्यावेळी अनिकेत खूप लहान होता. त्याला खूप भूक लागली होती म्हणून तो रडत होता. आमच्याजवळ असलेले दूध नासले होते. म्हणून मग दूध आणण्यासाठी मी ट्रेनमधून खाली उतरलो.
ट्रेन सुटू नये याची भीती असतानाही पाच ट्रॅक ओलांडून मी स्टेशन बाहेर असलेल्या रस्त्यावर गेलो. पण कुठेच दुकान नसल्याने निराश होऊन परत आलो. त्यावेळी माझ्या खिशात ४० हजार रुपये होते पण ते पैसे काहीच कामाचे नव्हते. शेवटी अनिकेतला ग्लुकोज बिस्कीट पाण्यात बुडवून खाऊ घातले होते. पैसा म्हणजेच सर्वकाही नसते हे त्यावेळी मला जाणवले. हा किस्सा आपल्याला एक धडा शिकवून गेला हे ते आवर्जून म्हणतात.