Join us

'जाणता राजा' साठी महाराजांच्या पात्राला आवाज दिला नाही कारण...अशोक सराफांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 10:02 AM

'जाणता राजा' महानाट्यात अशोक सराफ यांनी बाजीप्रभू देशपांडेंच्या पात्राला आवाज दिला.

अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांची वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही. मराठी सिनेसृष्टीत मोलाचं योगदान देणाऱ्यांपैकी ते एक अभिनेते आहेत. विनोदाच्या अचूक टायमिंगने त्यांनी नेहमीच प्रेक्षकांना खळखळून हसवलं. सामाजिक सेवेतही त्यांनी हातभार लावला. नुकतंच त्यांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कारने सम्मानित करण्यात आले. पुण्यात भाजप नेते आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी 'जाणता राजा'मध्ये बाजीप्रभू देशपांडे यांच्या पात्राला मी आवाज दिला होता असा खुलासा अशोक सराफ यांनी केला.

महाराष्ट्र कीर्ती सौरभ प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार सोहळा काल पुण्यात आयोजित करण्यात आला होता. अभिनेते अशोक सराफ यांना यंदाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी अशोक सराफ यांनी 'जाणता राजा' महानाट्याची एक आठवण सांगितली. ते म्हणाले,'जाणता राजा या महानाट्यात छत्रपती शिवाजी महाराजांना आवाज द्यावा असा निरोप बाबासाहेब पुरंदरे यांनी मला पाठवला होता. बाबासाहेब आणि माझी कधीच भेट किंवा ओळख झाली नव्हती. तरी छत्रपतींच्या पात्राला मी आवाज द्यावा अशी त्यांची इच्छा होती. मात्र महाराजांच्या पात्रासाठी मी आवाज देणं एवढी माझी कुवत नाही असं मला वाटलं. म्हणून मी नम्रपणे नकार कळवला. पण जाणता राजाशी जोडला जाण्याची माझी इच्छा होती म्हणून मी बाजीप्रभू देशपांडेंच्या पात्राला आवाज दिला. तो आवाज माझा आहे हे आजपर्यंत कोणालाच माहित नाही. मी पहिल्यांदाच जाहीरपणे याचा खुलासा करत आहे.'

पद्म पुरस्कारासाठी अशोक सराफ यांच्या नावाची शिफारस करणारट

दरम्यान कार्यक्रमात बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले,'सांस्कृतिक मंत्री या नात्याने मुख्यमंत्र्यांनी पद्म पुरस्कारांसाठी नावाची शिफारस करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. महाराष्ट्र सरकारच्यावतीने पद्म पुरस्कारासाठी अशोक सराफ यांच्या नावाची शिफारस करु. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला नाव मिळाले आणि माझा शोध संपला.  त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे आणि आजही करत आहेत. हे महाकठीण काम असते.' 

दरम्यान या कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मूर्ती शास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर, भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, माजी महापौर मुरलीधर मोहोळ हे देखील उपस्थित होते. श्रीमंत मोरेश्वर बळवंत पुरंदरे शिष्यवृत्ती प्रसाद तारे यांना देण्यात आली. तारे यांच्या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. 

टॅग्स :अशोक सराफमराठी अभिनेताछत्रपती शिवाजी महाराजबाबासाहेब पुरंदरे