मराठी अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांच्या विनोदी अभिनयाला तोड नाही. विनोदाचं अचूक टायमिंग साधत त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं. दादा कोंडकेंनंतरअशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे या फळीने मराठी सिनेसृष्टी गाजवली. अशोक सराफ यांनी दादा कोंडकेंच्या काही सिनेमात काम केलं आहे. त्यांच्या सिनेमांचे असे अनेक किस्से आहेत जे ऐकून आज हसू येतं. त्यातलाच एक किस्सा म्हणजे अशोक सराफ यांनी दादा कोंडकेंच्या (Dada Kondke) चित्रपटातील एका सीनला नकार दिला होता.
दादा कोंडके आणि अशोक सराफ यांची चित्रपटातील जोडी सुपरहिट होती. दोघंही एकमेकांच्या तोडीस तोड अभिनय करायचे. यामुळे प्रेक्षकांचं मनोरंजन व्हायचं. दादा कोंडकेंच्या 'एकटा जीव' या आत्मचरित्रात त्यांनी एक मजेशीर किस्सा लिहिला आहे. 'राम राम गंगाराम' या सिनेमात अशोक सराफ दादा कोंडकेंबरोबर काम करत होते. अशोक सराफ म्हांदू खाटीक ही मुस्लिम व्यक्तिरेखा साकारत होते आणि दादा कोंडके गंगारामच्या भूमिकेत होते. अशोक सराफ यांचा लुक पांढरा टीशर्ट, लुंगी आणि डोक्यावर टोपी असा होता. एका सीनमध्ये अशोक सराफ यांच्या लुंगीत पांढरी उंदीर शिरल्याचं दाखवायचं होतं. हे ऐकताच अशोक सराफ घाबरले. कारण पांढरा उंदीर चावतो असा त्यांचा समज होता. त्यामुळे त्यांनी सीन करायला थेट नकारच दिला.
अशोक सराफ यांची समजूत काढण्यासाठी दादा कोंडके आले. त्यांनी अशोक सराफांना सीन समजावून सांगितला आणि त्यांना आत्मविश्वास दिला. दादा कोंडकेंशी बोलल्यानंतर अशोक सराफ सीन करायला तयार झाले. त्यांनी ततो सीन चांगल्या पद्धतीने शूटही केला. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव तर अप्रतिमच होते असं म्हणत दादा कोंडकेंनी त्यांचं कौतुक केलं होतं.