Join us

अशी ही बनवाबनवी या चित्रपटाच्या आठवणींविषयी सांगतायेत अशोक सराफ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2018 3:29 PM

अशी ही बनवाबनवी हा चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला होता. या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावल्या होत्या. या चित्रपटातील अनेक संवाद आजही प्रेक्षकांचे तोंडपाठ आहेत. या चित्रपटाला 30 वर्षं झाले असले तरी हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.

अशी ही बनवाबनवी या चित्रपटाला नुकतेच 30 वर्षं पूर्ण झाले आहेत. हा चित्रपट 23 सप्टेंबर 1988 ला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले होते तर या चित्रपटात अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सुशांत रे, सचिन पिळगांवकर, अश्विनी भावे, प्रिया अरुण, निवेदिता सराफ, सुप्रिया पिळगांवकर, सुधीर जोशी, नयनतारा, विजू खोटे यांच्या मुख्य भूमिका होत्या. हा चित्रपट त्या काळात बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. या चित्रपटाने तीन कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. ऐंशीच्या दशकात मराठी चित्रपटाने कोटींमध्ये कमाई करणे ही गोष्ट क्वचितच घडत असे.

अशी ही बनवाबनवी हा चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला होता. या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावल्या होत्या. या चित्रपटातील अनेक संवाद आजही प्रेक्षकांचे तोंडपाठ आहेत. या चित्रपटाला 30 वर्षं झाले असले तरी हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. या चित्रपटात अशोक सराफ यांनी धनंजय माने ही व्यक्तिरेखा साकारली होती. या चित्रपटाच्या आठवणींविषयी अशोक सराफ सांगतात, अशी ही बनवाबनवी या चित्रपटाला 30 वर्षं झाली असली तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाही, हेच या चित्रपटाचे खरे यश आहे. कोणताही चित्रपट लोक काहीच वर्षांत विसरून जातात. एखादा चित्रपट प्रेक्षकांच्या इतक्या वर्षं स्मरणात असल्याचे खूपच कमी चित्रपटांच्या बाबतीत घडते. आजही अशी ही बनवाबनवी तितक्याच आवडीने पाहिला जातो. तसेच नव्या पिढीला देखील हा चित्रपट तितकाच आवडत आहे. एक दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांना काय दाखवायचे यावर सचिन चित्रीकरणाच्या वेळीच ठाम होता. त्याने प्रत्येक गोष्ट इतक्या चपखलपणे बसवल्यामुळेच प्रेक्षकांना हा चित्रपट प्रचंड आवडला. लक्ष्मीकांत बेर्डे, सुशांत रे, सचिन पिळगांवकर, अश्विनी भावे, प्रिया अरुण, निवेदिता सराफ आणि सुप्रिया पिळगांवकर यांसारखे चांगले कलाकार या चित्रपटाद्वारे एकत्र आले होते. चित्रपटाच्या सेटवर आमचे खेळीमेळीचे वातारण असायचे. आम्ही सगळेच आजही या चित्रपटाच्या प्रेमात आहोत. 

 

टॅग्स :अशोक सराफ