Join us

आशुतोष गोवारिकर सांगतायेत, या कारणामुळे मी दिग्दर्शन करत असलेल्या चित्रपटांमध्ये करत नाही काम

By प्राजक्ता चिटणीस | Published: November 24, 2019 6:00 AM

आशुतोष गोवारिकर यांनी दिग्दर्शित केलेल्या कोणत्याच चित्रपटात त्यांनी आजवर काम केलेले नाहीये.

ठळक मुद्देआशुतोष सांगतांयेत, दिग्दर्शन करण्याइतकेच अभिनय करणे देखील कठीण असते. या दोन्ही गोष्टींसाठी एकाग्रता गरजेची असते. त्याचमुळे मी दिग्दर्शन आणि अभिनय या दोन्ही गोष्टी एकत्र करू शकत नाही.

अर्जुन कपूर, क्रीती सॅनन आणि संजय दत्त यांच्या मुख्य भूमिका पानिपत या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांच्यासोबत या चित्रपटाबाबत मारलेल्या गप्पा...

पानिपत या विषयावरच चित्रपट बनवण्याचा विचार का केला?शालेय जीवनात आपण पानिपतच्या लढाईविषयी वाचले होते. या युद्धात केवळ एका दिवसांत एक लाख सैनिक शहीद झाले होते. पुणे सोडून एक किलोमीटर चालत आक्रमण करण्यासाठी जाण्याचा पेशव्यांनी निर्णय का घेतला? त्यावेळात कोणकोणत्या गोष्टी घडल्या, आक्रमण करण्याआधी त्यांच्यात काय चर्चा झाली असेल का असे अनेक प्रश्न माझ्या मनात अनेक वर्षं होते. या विषयावर कधीच चित्रपट बनवण्यात आलेला नव्हता. त्यामुळे या विषयावर चित्रपट करायचा असे अनेक वर्षं माझ्या डोक्यात सुरू होते. काही वर्षांपूर्वी रोहित शेलटकरने त्याला या विषयावर चित्रपट करायचा असल्याचे मला सांगितले आणि मी देखील त्याला होकार दर्शवला. या युद्धात सदाशिव पेशवे हरले असले तरी त्यांनी आणि त्यांच्या सैन्याने दाखवलेले शौर्य हे अफाट होते. हेच या चित्रपटात आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. 

ऐतिहासिक चित्रपटात कास्टिंग हे अतिशय महत्त्वाचे असते, ते तुम्ही कशाप्रकारे केले? मी या चित्रपटाची पटकथा लिहित असताना मी शेजवलकरांनी लिहिलेल्या इतिहासाचा संदर्भ घेतला होता. तसेच इतिहासकार पांडुरंग बलकावडे यांच्याकडून मदत घेतली. ही कथा समजून घेताना सदाशिव राव पेशवे हे अतिशय कुशल योद्धे होते. ते प्रचंड हट्टी होते हे माझ्या लक्षात आले. या भूमिकेसाठी अर्जुन कपूर योग्य असल्याचे मला वाटले. अहमद शाह अब्दाली ही भूमिका संजयच चांगल्याप्रकारे साकारू शकतो असा विश्वास असल्याने मी त्याला या चित्रपटासाठी विचारले आणि क्रीतीचा अभिनय मला बरेली की बर्फीमध्ये आवडला होता. ती एक खूप चांगली अभिनेत्री असून ती मराठी मुलगी वाटू शकेल असा मला विश्वास असल्याने पार्वती बाई या भूमिकेसाठी तिची निवड केली. निवड झाल्यानंतर त्यांना घोडेस्वार, तलवारबाजी यांचे प्रशिक्षण दिले. त्याचसोबत अर्जुन आणि क्रीती यांचे मराठी उच्चार योग्य व्हावेत यावर मेहनत घेतली. तसेच झीनत अमान, पद्मिनी कोल्हापूरे, रविंद्र महाजनी, गश्मीर महाजनी, मोहनिश बहल यांच्यासोबत मला नेहमीच काम करण्याची इच्छा होती. त्यामुळे या चित्रपटासाठी या कलाकारांना विचारले आणि त्यांनी देखील होकार दिला. रोहन मापुस्कर या चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर असून त्यांनी खूप चांगल्या कलाकारांची भट्टी यात जमवली आहे. तसेच नितीन चंद्रकांत देसाई, नीता लुल्ला, अजय-अतुल हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील दिग्गज या चित्रपटाशी जोडले गेले आहेत.

ट्रेलर सोशल मीडियावर लाँच झाल्यानंतर अर्जुन, संजयच्या निवडीवरून ट्रोलिंग करण्यात आली, त्यावर तुम्ही काय सांगाल? ट्रेलर लाँच झाल्यावर अर्जुन आणि रणवीरने साकारलेल्या बाजीराव मस्तानीमधील लूकची तुलना करण्यात आली. बाजीराव मस्तानी आणि पानिपत या दोन्ही चित्रपटांचा काळ सारखा असल्याने या चित्रपटांची तुलना होणार यात मला काही आश्चर्य वाटत नाही. त्या काळातील स्त्रियांची, पुरुषांची वेशभूषा, शनिवार वाडा हा कसा होता हे इतिहासात नमूद करण्यात आलेले आहे. त्याचप्रकारे आम्ही वेशभूषा केली आणि सेट उभारले आहेत. त्यामुळे लोकांना दोन्ही चित्रपटांमध्ये काही गोष्टीत साम्य वाटू शकते. आणि ट्रोलिंगचे विचाराल तर मी नेहमीच याकडे सकारात्मक दृष्टीने पाहातो. हेच लोक प्रेक्षक आहेत. त्यामुळे यांची विचारसरणी काय आहे हे ट्रोलिंगमुळेच कळते.

अभिनय आणि दिग्दर्शन या दोन्ही गोष्टीत तुम्हाला अधिक काय आवडते?खरे सांगू तर हा अतिशय अवघड प्रश्न आहे. दिग्दर्शन करण्याइतकेच अभिनय करणे देखील कठीण असते. या दोन्ही गोष्टींसाठी एकाग्रता गरजेची असते. त्याचमुळे मी दिग्दर्शन आणि अभिनय या दोन्ही गोष्टी एकत्र करू शकत नाही. त्यामुळे मी दिग्दर्शित करत असलेल्या चित्रपटात कधीच काम करत नाही. एखादी चांगली भूमिका ऑफर झाली आणि त्यावेळी मी माझ्या इतर प्रोजेक्टमध्ये व्यग्र नसेन तर मी नक्कीच ऑफर स्वीकारतो.

टॅग्स :आशुतोष गोवारिकरपानिपत